

घाटकोपर ः धक्का लागला या किरकोळ कारणावरून घाटकोपरच्या सीजीएस कॉलनी परिसरात एकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री घडली. या घटनेतील मृताचे नाव सुरेंद्र धोंडुराम पाचाडकर (वय 65) असे असून ते विक्रोळी पार्कसाईट परिसरात राहायचे. याप्रकरणी अमन श्रीराम वर्मा (वय 19, रा. रमाबाईनगर घाटकोपर पूर्व) यास पोलिसांनी अवघ्या पाच तासांत अटक केली.
याबाबत घाटकोपर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी नेहमीप्रमाणे सुरेंद्र हे घाटकोपर रेल्वे स्थानक परिसरात फेरफटका मारण्यास आले होते. घाटकोपर रेल्वे स्थानकाच्या शेजारी असलेल्या सीजीएस कॉलनीतून चालत जात असताना त्यांना आरोपी अमनचा धक्का लागला. यावरून त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली.
याचे पर्यावसन हाणामारीत झाले. यात अमनने जवळ पडलेला लोखंडी रॉड उचलून सुरेंद्र यांच्या डोक्यात घातला. यामुळे सुरेंद्र यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि ते खाली कोसळले. स्थानिकांनी एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती देताच घाटकोपर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमी अवस्थेत असलेल्या सुरेंद्र यांना जवळील खासगी रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
सुरुवातीला पोलिसांना हा अपघात असल्याचे वाटले. मात्र शवविच्छेदनामध्ये मारहाण झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केल्याने पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. घाटकोपर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सह पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर खरमाटे यांच्या पथकाने आरोपीचा शोध सुरू केला.सुमारे ऐंशी सीसीटीव्हींचा तपास करून पोलिसांनी अवघ्या पाच तासांत रमाबाई कॉलनी येथून आरोपीला अटक केली.पुढील तपास घाटकोपर पोलीस करीत आहेत. मात्र धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या या हत्येमुळे घाटकोपरमध्ये खळबळ उडाली आहे.