

भाईंदर : मिरा रोड येथील पार्क व्ह्यू बार अँड रेस्टॉरंटमध्ये काही दिवसांपूर्वी भारतीय सैन्यातील एका जवानाला मारहाण करण्यात आली होती. त्याविरोधात तसेच त्या रेस्टॉरंटच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी मराठी एकीकरण समितीने पालिकेकडे सतत पाठपुरावा करून आंदोलनाचा इशारा दिला होता. समितीच्या आंदोलनाच्या धास्तीने अखेर पालिकेने त्या रेस्टॉरंटवर शुक्रवारी तोडक कारवाई केली.
मीरारोड येथील पार्क व्ह्यू बार अँड रेस्टॉरंटमध्ये एका भारतीय सैन्यातील मराठी जवानाला मारहाण झाल्याची घटना घडली होती. या घटनेचा तीव्र निषेध करीत मराठी एकीकरण समितीने त्या रेस्टॉरंटच्या अनधिकृत बांधकामाचा मुद्दा उचलून धरला होता.
या हॉटेलमधील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी समिती 2018 पासून पाठपुरावा करीत होती. मात्र त्यावर न्यायालयीन स्थगिती असल्याने पालिकेकडून कारवाई केली जात नव्हती. दरम्यान, न्यायालयाचा स्थगिती आदेश उठूनही तसेच पालिकेच्या विधी विभागाने आदेश देऊनही प्रभाग अधिकाऱ्यांकडून त्या रेस्टॉरंटवर कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात होती.
समितीकडून वारंवार पाठपुरावा तसेच तक्रारी करूनही प्रभाग अधिकारी त्या रेस्टॉरंटवर कारवाई करीत नसल्याने त्याविरोधात समितीने शुक्रवारी दुपारी 1 वाजता प्रभाग समिती कार्यालय क्रमांक 4 मध्ये झोपा काढा आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. या इशाऱ्याची धास्ती घेत पालिकेच्या अतिक्रमण विभागाने शुक्रवारी दुपारी 1 वाजण्यापूर्वीच त्या रेस्टॉरंटच्या अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाई केली.
अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केव्हा?
एकीकडे सीमेवर रक्षण करणाऱ्या जवानाला मारहाण होते आणि दुसरीकडे प्रशासन त्याच हॉटेलच्या बेकायदा बांधकामाला पाठीशी घालते, हे खपवून घेतले जाणार नसल्याचा इशारा समितीने पालिकेला दिला आहे. तसेच अनेकदा तक्रारी करूनही कारवाई न करणाऱ्या प्रभाग अधिकाऱ्यावर कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी समितीकडून करण्यात आली आहे.