

सापाड : योगेश गोडे
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत सध्या सिमेंट काँक्रीट रस्त्यांचे जाळे झपाट्याने पसरत आहे. शहराला खड्डेमुक्त आणि टिकाऊ रस्ते मिळावेत म्हणून हे काम सुरू असले तरी, या कामात नियमभंगाचा प्रकार उघड झाला आहे. रस्त्याखालील पाईप लाइनवर थेट काँक्रीट ओतण्याचा प्रकार सुरू असलेला दिसून येत आहे.
सिमेंट काँक्रीट रस्ते बनवताना रस्त्याखालील पाण्याच्या पाईपलाइन बाजूला घेणे गरजेचे आहे. कारण, भविष्यात पाईपलाइन फुटल्यास, लिकेज झाल्यास किंवा बदलण्याची वेळ आल्यास, पुन्हा तोच काँक्रीट रस्ता फोडावा लागतो. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा निधी वाया जातो आणि नागरिकांचे हाल होतात. मात्र, कॉलेज परिसरात मूलभूत नियोजनच वाऱ्यावर सोडले आहे. रस्त्याखाली असलेल्या जुन्या पाईपलाइनवरच थेट सिमेंटचे थर ओतले जात आहेत.
भविष्यात या पाइपलाइनमध्ये गळती झाल्यास संपूर्ण काँक्रीट रस्ता उकरावा लागणार आहे, ज्यामुळे नागरिकांच्या पैशाचा अपव्यय आणि नागरिकांचा त्रास ओघाने येत आहे. या प्रकाराने अभियंत्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, ठेकेदारांकडून हे काम महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या थेट देखरेखीशिवाय सुरू आहे.
संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने येथे असे काम होताना दिसत आहे. ना तपासणी, ना मोजमाप, ना तांत्रिक मानके करत आहेत. भविष्यात हा रस्ता फोडावा लागल्यास नागरिकांचे व महापालिकेचे दोघांचेही नुकसान होणार आहे, असे मत पाणीपुरवठा विभागातील निवृत्त अभियंत्यांनी व्यक्त केले. या प्रकाराबद्दल स्थानिक नागरिक नीलेश शिरसाट यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याच पार्श्वभूमीवर समाजसेवक संतोष राजपूत, शैलेश महाजन, आणि राहुल केने यांनीही प्रशासनाच्या भूमिकेवर ताशेरे ओढले आहेत.
बिर्ला कॉलेज परिसरातील या नियमबाह्य कामामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. काही सामाजिक संघटनांनीही या प्रकरणाची चौकशी करून ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
“ही जनतेच्या पैशांची उधळण आहे. रस्त्याखाली पाईपलाइन ठेवून काँक्रीट ओतणे म्हणजे भविष्यातील संकटाला निमंत्रण देणे. महापालिकेने तत्काळ कारवाई केली पाहिजे.”
संतोष राजपूत, स्थानिक नागरिक
पाईपलाइन हलविण्याशिवाय काँक्रीट टाकणे म्हणजे तांत्रिक गुन्हा आहे. आम्ही संबंधित जबाबदाराविरोधात लेखी तक्रार दाखल करू.
शैलेश महाजन, वाहन चालक