

ठाणे: बालकांमधील कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या प्रमाणात चिंताजनक वाढ होत असल्याचे ‘ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज’ ने नुकत्याच दिलेल्या अहवालातून समोर आले आहे. 2023 पासून याबाबतचा अभ्यास या संस्थेने केला आहे. त्यातील वर्षभरातील आकडा सरासरी 17 हजार आहे. सुमारे 17 हजार मुलांचा कर्करोगामुळे मृत्यू झाल्याची नोंद असून बालमृत्यूच्या प्रमुख कारणांमध्ये कर्करोग दहाव्या स्थानावर पोहोचला आहे.
कर्करोग वाढणे ही जागतिक समस्या झाली असून, यामध्ये बालकांच्या मृत्यूचे प्रमाण चिंताजनक आहे. 2023 या एका वर्षात जगात 1 लाख 44 हजार एवढ्या बालकांचे मृत्यू झाले आहेत. तर भारतात 17 हजार बालकांचे मृत्यू झाले आहेत.
‘ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज’ या संस्थेने याबाबतचा अहवाल दिला असून, त्यावर आता वैद्यकीय क्षेत्रात सखोल मंथन सुरू झाले आहे. कर्करोगाने मृत्यू होणारे देश हे माध्यम उत्पन्न गटातील आहेत. वशिंग्टन विश्वविद्यालय यांनी 160 देशांचा डेटा एकत्रित करून याबाबतचे विश्लेषण केले आहे.
बालकांमधील कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या प्रमाणात चिंताजनक वाढ होत असल्याचे ‘ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज 2023’ अहवालातून समोर आले आहे. 2023 मध्ये सुमारे 17 हजार मुलांचा कर्करोगामुळे मृत्यू झाल्याची नोंद असून बालमृत्यूच्या प्रमुख कारणांमध्ये कर्करोग दहाव्या स्थानावर पोहोचला आहे.
वेळेवर निदानाचा अभाव, अपुऱ्या उपचार सुविधा आणि आरोग्य व्यवस्थेतील तफावत ही या वाढीमागील प्रमुख कारणे मानली जात आहेत. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते पर्यावरणीय बदल, जीवनशैलीतील बदल, अन्न, पाणी हवा यातील प्रदूषण आणि अनुवांशिकता या कारणांमुळे बालकांमध्ये कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे.
कर्करोग ही समस्या आता प्रौढांपुरती मर्यादित न राहता बालकांमध्येही वेगाने वाढताना दिसत आहे. अनेक ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता, अत्याधुनिक तपासणी सुविधा आणि उपचार व्यवस्था अपुरी असल्याने बालकांच्या उपचारात विलंब होतो. ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील मुलांना याचा सर्वाधिक फटका बसत असून त्यामुळे मृत्यूदर वाढत असल्याचे तज्ज्ञांचे निरीक्षण आहे.
जागतिक पातळीवरही परिस्थिती गंभीर आहे. मुलांमधील कर्करोगाशी संबंधित मृत्यूंपैकी सुमारे 94 टक्के मृत्यू कमी व मध्यम उत्पन्न गटातील देशांमध्ये होत आहेत. दक्षिण आशिया हा या समस्येचा मोठा केंद्रबिंदू ठरत असून जागतिक बालकर्करोग मृत्यूंपैकी 20.5 टक्के मृत्यू या प्रदेशात नोंदवले गेले आहेत. 1990 ते 2023 या कालावधीत या मृत्यूंच्या प्रमाणात 16.9 टक्क्यांची वाढ झाली आहे.
अहवालानुसार, 2023 मध्ये जगभरात सुमारे 3.77 लाख नवीन बालकर्करोग प्रकरणे समोर आली, तर 1.44 लाख मुलांचा मृत्यू झाला. तज्ज्ञांच्या मते, वेळेवर निदान आणि योग्य उपचार मिळाल्यास 80 टक्क्यांहून अधिक मुले पूर्णपणे बरी होऊ शकतात. मात्र, प्रत्यक्षात अनेक प्रकरणे उशिरा निदान होतात, ही चिंतेची बाब आहे.
राष्ट्रीय स्तरावरील कर्करोग नियंत्रण उपक्रमांमध्ये बालकर्करोगाला अपेक्षित प्राधान्य मिळत नसल्याची टीका होत आहे. बालकांसाठी स्वतंत्र धोरण, सुलभ तपासणी यंत्रणा आणि परवडणाऱ्या उपचारांची आवश्यकता अधोरेखित केली जात आहे. विशेषतः ग्रामीण भागात आरोग्य सेवा बळकट करणे, प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करणे आणि जनजागृती वाढवणे ही काळाची गरज असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. वेळीच निदान, सुलभ उपचार आणि प्रभावी आरोग्य धोरण यांच्या माध्यमातून बालमृत्यूंचे प्रमाण कमी करणे शक्य असून अधिक संवेदनशील घेण्याची आवश्यकता आहे.
प्रमुख कारणे
वेळेवर निदानाचा अभाव
उपचारासाठी आवश्यक सुविधा अपुऱ्या
आर्थिक अडचणी
ग्रामीण भागातील अपुरी आरोग्यसेवा
जनजागृतीचा अभाव
उपाययोजना
राष्ट्रीय कर्करोग नियंत्रण कार्यक्रमात बालकर्करोगाचा स्वतंत्र समावेश
लवकर तपासणी व निदान यंत्रणा बळकट करणे
परवडणाऱ्या उपचारांची उपलब्धता वाढवणे
प्रशिक्षित वैद्यकीय मनुष्यबळ वाढवणे
जनजागृती मोहिमा प्रभावीपणे राबवणे
“ताज्या आकडेवारीनुसार लहान मुलांमधील कर्करोगाचे प्रमाण वाढताना दिसणे ही चिंताजनक बाब आहे. यामागील नेमकी कारणे अजून स्पष्ट नसली तरी पर्यावरणीय घटक, जीवनशैलीतील बदल, अन्न पाणी हवा यातले प्रदूषण आणि क्वचित आनुवंशिक कारणांचा त्यात सहभाग आहे. निदान पद्धतींमध्ये झालेली प्रगतीही या वाढलेल्या आकडेवारीमागे काही अंशी कारणीभूत असू शकते. पालकांनी मुलांमधील असामान्य लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये आणि वेळेवर वैद्यकीय सल्ला घ्यावा. लवकर निदान आणि योग्य उपचारांमुळे कॅन्सर बरे होण्याचे प्रमाण वाढते, ही सकारात्मक बाब यात लक्षात घेणे आवश्यक आहे.”
- डॉ. सचिन जायभाये, फिजिशियन - मुक्ता क्लिनिक, अलिबाग