

रेवदंडा : रेवदंडा परिसरात एक भीषण अपघात घडला आहे. एका सिमेंट मिक्सर ट्रक खाडीत पलटी होऊन चालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. राहुल कुमार प्रभू महतो (वय 31, रा. बिहार, सध्या रेवदंडा) हे फिर्यादी असून ते अशोका बिल्डकॉन कंपनीच्या कॅम्पमध्ये वास्तव्यास आहेत.
चुनेकोळीवाडा येथील आर.एम.सी. प्लांटवरून सिमेंट भरून ट्रक साईटकडे जात असताना चालक अरविंदकुमार प्रभाशंकर (वय 37, रा. उत्तर प्रदेश) याने ओळख असल्याने राहुल यांना ट्रकमध्ये बसवून घेतले.
रात्री सुमारे 11.15 वाजण्याच्या सुमारास खाडी पूल पार केल्यानंतर अवघ्या 50 ते 60 मीटर अंतरावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. रोडचा अंदाज न आल्याने मिक्सर ट्रक रस्त्याच्या डाव्या बाजूने थेट खाडीत कोसळून पलटी झाला.
प्रसंगावधान राखत फिर्यादी राहुल महतो यांनी खाडीत उडी मारून आपला जीव वाचवला. मात्र, ट्रक पाण्यात पलटी झाल्याने केबिनमध्ये पाणी शिरले आणि चालक अरविंदकुमार प्रभाशंकर हे केबिनमध्ये अडकून बुडाल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या अपघातात फिर्यादी यांचाही डोक्याला दुखापत झाली आहे. या प्रकरणाची नोंद रेवदंडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास पीएसआय एन. आर. अंगज हे करत आहेत. स्थानिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. दरम्यान खाडीत पडलेला अपघाती ट्रक क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आला.