

अलिबाग: गेले तीन दिवस रायगड जिल्ह्यात चटके जास्त बसत आहेत. तापमान सुमारे 36 अंश सेल्सियसच्यावर गेले आहे. ऊन वाढल्याने रायगडकरांच्या अंगाची लाही लाही होत आहे. दुपारच्या वेळी बाजारपेठांसह रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील पेण माणगाव, महाड, पोलादपूर, खालापूर, सुधागड पाली मध्ये सर्वाधिक तापमान असते. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, असा इशारा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यातील अनेक भागात हवेत गारवा असला, तरीदेखील तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून सकाळी दहा वाजल्यापासून उन्हाचे चटके जाणवत आहेत. उन्हापासून बचाव करण्यासाठी काहीजण स्कार्प, तर काही जण काळ्या गॉगलचा वापर करीत आहेत. या वाढत्या तापमानामुळे आरोग्यावरही परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे.
चक्कर येणे, उष्माघात जाणवणे अशा अनेक प्रकारचा त्रास होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जिल्ह्यात सध्या 36 अंश सेल्सअस ते 45 अंश सेल्सियस इतके तापमान आहे. मात्र, गेले दोन दिवस तापमानात वाढ झाली आहे.
या वाढत्या तापमानापासून बचाव करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सर्तक राहण्याचा इशारा दिला आहे. उष्माघात टाळण्यासाठी वेगवेगळे उपाय सुचविण्यात आले आहेत. उन्हामुळे डोकेदुखी, उलट्या येणे, रक्तदाब वाढणे किंवा कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. उष्माघातापासून वाचण्यासाठी कॅफीन आणि मद्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. सौम्य रंग, ढिले कपडे वापरा, सतत पाणी प्या, असा सल्ला प्रशासनाकडून दिला जात आहे.
शरीरात गारवा निर्माण करण्यासाठी नागरिकांनी शीतपेयांना अधिक पसंती दर्शविली आहे. लिंबू सरबत, उसाचा रस , मसाला सोडा, मँगोसह अनेक प्रकारचे थंड ज्यूस पिण्यावर ग्राहक भर देत आहेत. त्यामध्ये सर्वात जास्त नारळ पाणी पिण्यासाठी ग्राहकांची गर्दी असल्याचे दिसून येत आहे. नारळ पाणी शरीरात गारवा निर्माण करण्याबरोबरच आरोग्यासाठीदेखील पोषक असल्याने त्याला अधिक पसंती आहे.
जिल्ह्यात उन्हाचे चटके जाणवू लागले आहे. विनाकारण दुपारी 12 ते सायंकाळी चार या वेळेत कोणीही घराबाहेर पडू नये. उन्हामुळे तीव्र घाम येणे, मळमळणे, चक्कर येण्याचा धोका अधिक आहे. या कालावधीत पाणी जास्त प्यावे. दोन वेळा आंघोळ करावी. लिंबू पाण्याबरोबरच नारळ पाण्याचे सेवन करावे. उन्हामुळे उष्माघाताचा धोका निर्माण होण्याची भीती आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने उपजिल्हा रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उष्माघात केंद्र सुरु करण्यात आले आहे.
- डॉ.निशिकांत पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक रायगड
गेल्या पंधरा दिवसांपूर्वी 400 ते 500 रुपये शेकड्याने लिंबू मिळत होते. दहा रुपयांना दोन लिंबू विकले जात होते. मात्र, सध्या तापमान वाढू लागले आहे. उन्हाचे चटके जाणवत आहे. लिंबूला प्रचंड मागणी वाढली आहे. त्यामुळे लिंबूचे दरही गगनाला भिडले आहे. पंधरा दिवसात लिंबूच्या दरात दुपटीने वाढ झाल्याचे चित्र आहे. 900 ते 1000 रुपये शेकड्यांनी लिंबू मिळत आहे. त्यामुळे दहा रुपयाला एक लिंबू व वीस रुपयाला दोन लिंबू विकण्याची वेळ आली आहे.
- सचिन चोरगे, भाजी विक्रेते