

ठाणे : आपल्या वादग्रस्त कारभारामुळे नेहमीच टीकेचे धनी होत असलेल्या वाहतूक विभागाचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. टोईंग केलेली गाडी वाचवण्यासाठी व्हॅनच्या मागे धावणाऱ्या नागरिकाचा अपघात होऊ नये यासाठी त्याला वाचवणारे दक्ष नागरिक रोहित जोशी यांनाच वाहतूक विभागाने चलान पाठवले आहे. संबंधित दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करण्याबरोबरच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी जोशी यांनी केली आहे.
दक्ष नागरिक रोहित जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 ऑक्टोबर रोजी, कळवा नाका या ठिकाणी रोहित जोशी आपल्या मोटारसायकलने प्रवास करत असताना, त्यांनी पाहिले की कंत्राटी टोइंग व्हॅनचे दोन कर्मचारी ज्यांनी फोटो आयडी सुद्धा घातलेला नव्हता ते रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या एका दुचाकीला टो करत होते. याचवेळी दुचाकीचा मालक तत्काळ घटनास्थळी पोहोचला आणि त्याने टोइंग व्हॅनच्या चालकाला विनंती केली की, त्याचे वाहन सोडावे, कारण तो जागेवरच दंड भरण्यास तयार होता. मात्र, टोइंग व्हॅनमध्ये उपस्थित असलेल्या वाहतूक हवालदाराने या विनंतीकडे दुर्लक्ष केले आणि टोइंग व्हॅनचा चालक वाहन घेऊन पुढे निघून गेला.
दुचाकीचा मालक टोइंग व्हॅनच्या मागे धावू लागल्याने टोइंग व्हॅनच्या मागे धावताना टोईंग व्हॅनच्या खाली येऊन गंभीर अपघात होण्याची शक्यता असल्याचे जोशी यांच्या लक्षात आले. एक दक्ष नागरिक म्हणून जोशी यांनी आपल्या मोटारसायकलवरून टोइंग व्हॅनला ओव्हरटेक केले आणि व्हॅनच्या समोर आपली मोटारसायकल लावून तिला थांबण्यास भाग पाडले. त्यांनी टोइंग व्हॅनच्या चालकाला आणि सोबत असलेल्या वाहतूक हवालदाराला गाडीचा मालक जागेवर दंड भरण्यास तयार असताना चालकाने व्हॅन का थांबवली नाही? हवालदाराने चालकाला व्हॅन थांबवण्याचे आदेश का दिले नाहीत? हवालदाराने स्वतः घटनास्थळी दंड का वसूल केला नाही? असे प्रश्न विचारले. याचवेळी नागरिकांची देखील मोठी गर्दी झाली. या प्रश्नांवर वाहतूक हवालदार चिडला आणि त्याने जोशी यांना कायदेशीर कारवाईची धमकी दिली, कोणतेही वाहतूक नियमांचे उल्लंघन केले नसतानाही या प्रकारानंतर वाहतूक विभागाकडून त्यांना 1250 सिग्नल तोडण्याचे चलान पाठवण्यात आले आहे.
कंत्राटी टोईंग एजन्सीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
केवळ दक्ष नागरिक म्हणून संभाव्य अपघात टाळण्याची जबाबदारी पार पाडली आणि कोणाही वाहतूक नियमांचे उल्लंघन केलेले नाही. उलट, टोइंग व्हॅन कर्मचाऱ्यांनी आणि हवालदाराने नियमांचे पालन केले नाही असे जोशी यांचे म्हणणे आहे. या घटनेमुळे ठाणे वाहतूक पोलिसांच्या कंत्राटी टोइंग एजन्सीच्या कार्यपद्धतीवर आणि कर्मचाऱ्यांच्या वर्तनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यापूर्वीही अशा टोइंगच्या घटनांमुळे नागरिकांना अपघात झाल्याची उदाहरणे आहेत, ज्यावर न्यायालयांनी गंभीर दखल घेतली आहे.
या सर्व प्रकारानंतर रोहित जोशी यांनी या चलानला कायदेशीररित्या आव्हान दिले असून, या घटनेची सखोल चौकशी आणि दोषींवर कारवाईची मागणी केली आहे. त्यांनी ठाणे वाहतूक पोलिसांच्या एसओपी आणि नियमांचे पालन करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे, जेणेकरून अशा घटना पुन्हा घडू नयेत आणि नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले जावे.
कंत्राटी टोइंगमुळे होणारा अन्याय आणि धोका थांबवण्यासाठी तातडीचे धोरणात्मक बदल आवश्यक आहेत. जी पी एस-आधारित पारदर्शक अंमलबजावणी, ऑनलाईन दंड प्रणाली आणि फक्त अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांवरच टोइंग या उपायांनी नागरिकांचा विश्वास परत मिळेल आणि रस्ते सुरक्षा खरोखर सुधारेल तसेच भ्रष्टाचाराला आळा बसेल.
रोहित जोशी, दक्ष नागरिक