

दिवा/नेवाळी : ठाणे महानगरपालिका क्षेत्रात असलेल्या दिवा प्रभाग समितीच्या अंगणात येणाऱ्या भागातील कचरा संकलक ठाणे मनपाने बंद केला आहे. कचरा संकलन बंद असल्याने परिसरात प्रचंड दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले असून जागोजागी कचऱ्याचे ढिगारे साचले आहेत. सातत्याने मनपा अधिकाऱ्यांशी संवाद साधून कचरा उचलण्यासाठी विनंती करून सुद्धा ठाणे मनपाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. या परिस्थितीची भाजपा पदाधिकाऱ्यांनी चीड आल्याने तसेच प्रशासनाचा निषेध म्हणून आज भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्हा उपाध्यक्ष विजय भोईर, दिवा- शील मंडळ अध्यक्ष सचिन रमेश भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यातील आठ ते दहा ड्रम कचरा सर्व पदाधिकाऱ्यांनी पालिकेतील घन कचरा विभागाच्या ऑफिसच्या बाहेर टाकला. त्यावेळी पालिकेच्या नावाने हाय हायच्या घोषणा देऊन तीव्र निदर्शने केली.
यावेळी महिला मोर्चा अध्यक्षा सपना भगत, रोशन भगत, प्रवीण पाटील, नितीन कोरगावकर, साधना सिंह, पुनम सिंह, अनुराग पाटील, विजय वाघ, कल्पेश सारस्वत, तसेच भाजपचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या. पालिका प्रशासनाने तात्काळ कचरा उचलण्याची कार्यवाही सुरू न केल्यास अधिक आक्रमक आंदोलन छेडण्याचा इशारा भाजपाकडून त्यावेळी देण्यात आला.
दिव्यातील दिवा पश्चिम, सद्गुरु नगर, साईबाबा मंदिर, दातिवली स्मशानाच्या बाजूला, एसएमजी शाळेजवळ, ग्लोबल शाळेच्या मागे, मारुती नगर या प्रमुख ठिकाणी कचऱ्याचे ढिग जमा झालेले होते. दिव्यात रोज किमान 35 ते 40 टन कचरा जमा होतो. गेल्या आठवड्यातील बुधवार, गुरुवार पासून न उचलला गेलेला कचरा हा रोजच्या रोज वाढतच होता. त्यावर दिव्यातील इतर पक्षांनींही नाराजी दर्शविली पण पालिका प्रशासनाने कचरा उचलण्यासाठी कोणताही ठोस उपाय योजना अजूनही केली नसल्याने कचरा वाढतोच आहे. त्याच्या निषेध करण्यासाठी आज भाजपाने तो कचरा उचलून पालिकेत टाकला.
कल्याण लोकसभा मतदारसंघात असलेल्या ठाणे मनपा क्षेत्रातील कल्याण ग्रामीण भागात कचऱ्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. डायघर येथील वीज निर्मिती प्रकल्पात ठाणे मनपाने वीज निर्मिती सोडून दुर्गंधी निर्माण केली आहे. त्यामुळे ठाण्याच्या कचऱ्याला डायघर ग्रामस्थांनी बंदी घातली आहे. वारंवार कचरा प्रश्नी तक्रारी करून सुद्धा कोणत्याही दखल घेतल्या जात नसल्याने ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. मनसेचे विभाग अध्यक्ष शरद पाटील यांनी नुकतीच राज्याचे फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आहे.
गावांमधील कचरा उचलला जात नसल्याने दिवा विभागाला मालमत्ता करातून सूट देण्याची मागणी करण्यात आली आहे. तर गुरुवारी दिवा भाजपाने दिवा शीळ रस्त्यावरील प्रभाग समिती लक्ष केली आहे. आजूबाजूच्या परिसरात दुर्गंधी पसरवलेला कचरा थेट उचलून कार्यालयात टाकून ठाणे मनपा प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे. यावेळी भाजपा ठाणे जिल्हा उपाध्यक्ष महिला मोर्चा सपना भगत, दिवा मंडळ अध्यक्ष सचिन भोईर, जिल्हा कार्यकारणी सदस्य रोशन भगत, अंकुश मढवी, प्रवीण पाटील यांसह अन्य भाजपासह पदाधिकारी उपस्थित होते.