

मुंबई : कांदिवली येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर (शताब्दी) महापालिका सर्वसाधारण रुग्णालयातील ईसीजी तंत्रज्ञ रजेवर गेले आहेत. परिणामी, गेल्या काही दिवसांपासून ईसीजी विभाग बंद आहे. यामुळे रुग्णालयामध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांचे हाल होत असून त्यांना ईसीजी काढण्यासाठी मालाड येथील एम. ब्ल्यू. देसाई किंवा बोरिवलीतील भगवती रुग्णालयामध्ये पाठविले जात आहे.
यासंदर्भात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर रूग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कांदिवली शताब्दी रुग्णालयामध्ये ईसीजी तंत्रज्ञाची दोन पदे मंजूर आहेत. त्यापैकी एक पद भरले आहे. परिणामी, रुग्णालयामध्ये फक्त सकाळच्या सत्रातच रुग्णांचे ईसीजी काढण्यात येत होते. त्यामुळे रात्रीच्या पाळीत रुग्णांचे ईसीजी डॉक्टर व परिचारिकांच्या माध्यमातून काढण्यात येत होते. त्यातच आता ईसीजी तंत्रज्ञही रजेवर गेल्याने रुग्णालयातील ईसीजी विभाग बंद झाला आहे.
बाह्यरुग्ण विभागात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांचा ईसीजी काढण्यात येत नाही. या रुग्णांना ईसीजी काढण्यासाठी मालाडच्या एम.डब्ल्यू.देसाई रुग्णालय किंवा बोरिवलीतील भगवती रुग्णालयात पाठविण्यात येत आहे.तसेच काही रुग्णांना बाहेरून ईसीजी काढण्याचाही सल्ला दिला जात आहे. त्यामुळे रुग्णांना विनाकारण नाहक त्रास सहन करावा लागत असून त्यांना आर्थिक भूर्दंडही सहन करावा लागत आहे.यासंदर्भात रुग्णालय प्रशासनाने जातीने लक्ष घालून रुग्णालयात ईसीजीसाठी पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी रुग्णांमधून करण्यात येत आहे.
सदर विभागातील ईसीजी तंत्रज्ञ बाल संगोपन रजेवर गेल्या आहेत. त्यामुळे बाह्यरुग्ण विभागातील रुग्णांचा ईसीजी काढला जात नाही. मात्र रुग्ण कक्षात दाखल असलेल्या रुग्णांचा व आपत्कालिन विभागातील रुग्णांचा ईसीजी डॉक्टर व परिचारिकांच्या माध्यमातून काढला जात आहे.
डॉ. अजय गुप्ता, वैद्यकीय अधीक्षक, शताब्दी रूग्णालय