

डोंबिवली : डोंबिवली-भिवंडीला जोडणाऱ्या मोठागाव-माणकोली खाडीवरील उड्डाण पुलावर रात्रीच्या सुमारास स्पोट्स बाईकस्वारांचे जीवघेणे स्टंट सुरू आहेत. दुचाक्यांवरील आशा स्टंटबाजांमुळे स्वतःसह पुलावरून ये-जा करणाऱ्या प्रवासी आणि पादचाऱ्यांच्या पोटात भितीचा गोळा उठत असून त्यांच्या जीवाला धोका देखिल वाढला आहे. या पुलावर मद्यपींचा देखील वावर वाढला आहे. दुकानातून दारू/बिअर आणून चाखण्याचा आस्वाद घेत मद्यपान करणाऱ्यांची संख्या देखील वाढत चालली आहे. एकीकडे भिवंडी आणि डोंबिवलीतील अनेक टवाळखोर तरूण या पुलावर संध्याकाळ झाल्यानंतर रात्री उशिरापर्यंत धुडगूस घालत आहेत. तर दुसरीकडे स्टंटबाजांचे समर्थन करणाऱ्यांनी केलेल्या व्हिडिओने समाज माध्यमांवर धुमाकूळ घातला आहे.
या पुलाचा ताबा आतातर जीवघेणे थरार करणाऱ्या स्टंटबाजांनी घेतला आहे. दारूड्यांचा अड्डा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पुलावरील मद्यपींची गर्दी आणि तरूणांचे दुचाकीवरील जीवघेणे थरार पाहून अशा टवाळखोर तरूणांना पोलिसांचा धाक राहिला नसल्याचे दिसून येते. मध्यरात्रीच्या सुमारास मुंबई/ठाणे परिसरातील रात्रपाळीचे काम संपवून अनेक नोकरदार खासगी किंवा भाड्याच्या वाहनाने या उड्डाण पुलावरून डोंबिवलीकडे येतात. अशावेळी अनेक झिंगलेले तरूण पुलावरील रस्त्यावर आडवे होऊन वाहने थांबविण्याचा प्रयत्न करतात. वाहने थांबवली नाही की हातात मिळेल वस्तू वाहनाच्या दिशेन फेकून मारत असल्याच्या प्रवाशांकडून तक्रारी वाढल्या आहेत.
स्पोर्टस बाईक किंवा सुसाट वेगाने धावणाऱ्या दुचाक्यांसह काही तरूण पुलावर कानठळ्या, कर्णकर्कश आवाज करत आपल्या दुचाक्यांवर जीवघेणे स्टंट थरार करत पुलाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत शंभर सव्वाशे किमी वेगाने पळवतात. एखाद्याला भरधाव दुचाकी नियंत्रणात आणता आली नाही तर मात्र, दुचाकी थेट खाडीत कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. या संदर्भात स्थानिक रहिवासी तथा उबाठाचे जिल्हाध्यक्ष दीपेश म्हात्रे यांनी समाज माध्यमांद्वारे पोलिसांचे लक्ष वेधले आहे.