

ठाणे : उच्च न्यायालयाच्या आदेशाने दिव्यातील सात इमारती रिकाम्या करून त्यांच्यावर ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. दिव्यानंतर आता उच्च न्यायालयाच्या आदेशानेच नौपाडा आणि माजिवडा येथील दोन मोठ्या इमारतींवर पालिका लवकरच हातोडा चालवणार आहे. या दोन्ही इमारतींना रहिवाशांनी पूर्णपणे व्याप्त असून दोन्ही इमारतींमध्ये मिळून 104 कुटुंबानी व्याप्त असलेल्या या इमारती रिकाम्या करून या इमारतींवर कारवाई करण्याचे मोठे आव्हान पालिका प्रशासना समोर आहे.
एरवी अनधिकृत बांधकामाकडे कानाडोळा करणाऱ्या ठाणे महापालिकेला उच्च न्यायालयाने दणका दिल्यानंतर अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचा पालिका प्रशासनाने सपाटा लावला आहे. दिव्यात गेल्या काही दिवसांपासून अनधिकृत इमारती पडण्याची जोरदार मोहीम सुरु असून दिवाळीच्या सुट्टीनंतर पुन्हा एकदा या मोहिमेला वेग आला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानेच दिव्यात सात इमारती रिकाम्या करून पालिकेने या सर्व अनधिकृत इमारती आता पडायला सुरुवात केली आहे.
या इमारती रिकाम्या करताना पालिका प्रशासनाला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. आता दिव्यानंतर लवकरच पालिकेचा मोर्चा हा ठाण्यातील दोन मोठ्या अनधिकृत इमारतींवर कारवाई करण्यासाठी वळणार असून लवकरच या इमारतींवर महापालिकेचा हातोडा पडणार आहे.यामध्ये नौपाडा प्रभाग समिती क्षेत्रात असलेली साई अंजुमन आणि माजिवडा मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रात असलेली साई दर्शन अशा दोन इमारतींचा समावेश आहे.
नौपाड्यातील साई अंजुमन या इमारतीसंदर्भात गुलाम रहमान जिलानी यांनी न्यायालयात याचिका दाखल केली असून ही इमारत तोडण्याचे आदेश न्यायालयाने यापूर्वीच दिले होते. मात्र तरीही पालिकेच्या वतीने कोणत्याच प्रकारची कारवाई करण्यात आली नव्हती. त्यानंतर यासंदर्भयात न्यायालयाचा आदेश न पाळल्यामुळे अवमान याचिका देखील दाखल करण्यात आली होती. त्यानंतर मात्र आता या इमारतीवर कारवाई निश्चित मनाली जात आहे. साई अंजुमन ही तळ अधिक 7 मजल्यांची इमारत असून या इमारतीमध्ये एकूण 48 कुटुंबे वास्तव्यास आहेत.
104 कुटुंबावर बेघर होण्याची वेळ
दुसरीकडे माजिवडा मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रातील साई दर्शन ही अतिशय मोठी सोसायटी असून या सोसायटीमध्ये तीन इमारतींचा समावेश आहे. एक इमारत तळ अधिक 7 मजल्यांची असून 19 रहिवाशी फ्लॅट असून 3 व्यावसायिक गाळे आहे. दुसऱ्या इमारत तळ अधिक 5 मजल्याची इमारत असून यामध्ये 12 कुटुंबे वास्तव्यास आहेत. तर तिसऱ्या इमारत तळ अधिक 5 मजल्याची असून या इमारतीमध्ये 24 कुटुंबे वास्तव्यास आहेत. अशा दोनी इमारतींमध्ये 104 कुटुंबे वास्तव्यास असून या सर्व कुटुंबावर बेघर होण्याची वेळ येण्याची शक्यता आहे.