

भिवंडी : भिवंडी महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर तब्बल एक महिन्याने महापौर व उपमहापौर पदासाठी 20 फेब्रुवारी रोजी आयोजित केलेल्या निवडणुकीसाठी सोमवार (16) रोजी दुपारी तीन ते पाच या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. यावेळी काँग्रेस पाठोपाठ भाजपा, शिवसेना यांनी आपल्या समर्थक नगरसेवकांसह उमेदवार अर्ज दाखल केले परंतु यावेळेस सर्वात लक्ष वेधून घेतलं ते कोणार्क विकास आघाडीचे माजी महापौर विलास पाटील व भिवंडी विकास आघाडीचे जावेद दळवी यांनी पालिका सभागृहात कोणत्याच पक्षाला बहुमत नसल्याने महापौर पदासाठी चुरस वाढली आहे.
महापौर पदासाठी कोणार्क विकास आघाडीचे विलास आर पाटील त्यांचा मुलगा ॲड.मयुरेश विलास पाटील, पत्नी माजी महापौर प्रतिभा पाटील, भिवंडी विकास आघाडीचे जावेद दळवी, काँग्रेसचे तारीक मोमीन,भाजपा कडून नारायण चौधरी, स्नेहा मेहुल पाटील, शिवसेने कडून बाळाराम चौधरी, सुचिता रुपेश म्हात्रे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तर उपमहापौर पदासाठी तारिक मोमिन (काँग्रेस), अस्मिता प्रभुदास नाईक (शिवसेना), सुहास नकाते (भाजपा), जावेद दळवी (भिवंडी विकास आघाडी), ॲड. मयुरेश पाटील (कोणार्क विकास आघाडी), शेख अरीब मोहम्मद याकूब (समाजवादी पार्टी) यांनी अर्ज दाखल केले आहेत.
पालिका सभागृहात कोणत्याच पक्षाला बहुमत नसल्याने समाजवादी पार्टी (6), कोणार्क विकास आघाडी (5) व भिवंडी विकास आघाडी (3) या सदस्यांना महत्त्व आले आहे. तर भाजपा महापौर व उपमहापौर निवडणुकीत उतरत असताना शिवसेनेने सुद्धा या दोन्ही निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महायुती मध्ये बिघाडी झाली आहे. तर भिवंडी सेक्युलर फ्रंट मधून समाजवादी पार्टीचे नगरसेवक पहिल्या दिवसांपासून फारकत घेऊन आहेत. त्यामुळे महापौर निवडणुकीतील चुरस वाढली असून बहुमताची मॅजिक फिगर 46 गाठण्यासाठी मोठ्या प्रमाणावर घोडेबाजार होणार असे संकेत मिळत असल्याने कोण बाजी मारणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
भिवंडी महापालिका निवडणुकीतील कोणार्क विकास आघाडीचे माजी महापौर विलास आर.पाटील यांना शुक्रवारी रात्री उशिरा आर्थिक गुन्हे शाखेने अटक केल्या नंतर शनिवारी त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. या दरम्यान 16 फेब्रुवारी रोजी महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ असल्याने शनिवारीच विलास पाटील यांच्या वतीने ॲड.नारायण अय्यर यांनी न्यायालय समोर 16 फेब्रुवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी न्यायालया कडून मुभा मिळावी असा विनंती अर्ज केला होता. त्यावर सोमवारी (16) रोजी बारा वाजता पोलिसांनी भिवंडी न्यायालयात आपली हरकत नसल्याचे स्पष्ट केल्यावर न्यायालयाने विलास पाटील
यांना काही अटी शर्ती घालीत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असल्याचा निर्णय दिला. विलास पाटील यांनी माध्यमांशी बोलू नये, आर्थिक गुन्हे शाखा कार्यालयात कोणाशी संपर्क साधू नये व पोलिस बंदोबस्ताचा खर्च उचलावा अशा अटींवर परवानगी देण्यात आली. त्यानंतर पालिका मुख्यालयास पोलिस छावणीचे स्वरूप देत मोठा पोलिस फौजफाटा पालिका मुख्यालयात तैनात करण्यात आला. त्यांनी साडेतीन वाजता पालिका मुख्यालयात पोलिस बंदोबस्तात दाखल होत आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर कोणाशीही न बोलता विलास पाटील यांना पोलिसांनी बंदोबस्तात पुन्हा ठाणे येथे घेऊन गेले आहेत. विलास पाटील यांना न्यायालयाने मुभा दिल्याने भिवंडी महापौर पदासाठीच्या निवडणुकीत अधिक चुरस निर्माण झाली आहे.