

मुंबई : मुलुंड येथे निर्माणाधीन मेट्रो मार्गिकेचा काही भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेतील एक जखमी व्हेंटिलेटरवर आहे, तर आणखी एकाला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.
शनिवारी मुलुंड येथे मेट्रो-4 मार्गिकेच्या बांधकामातील काही भाग कोसळल्याने रिक्षा आणि चारचाकी गाडीचा चक्काचूर झाला होता. यात उत्तर प्रदेशचे सरपंच रामधन यादव यांचा जागीच मृत्यू झाला. राजकुमार यादव यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. त्यांचे नातेवाईक सर्वेश यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार राजकुमार हे सध्या व्हेंटिलेटरवर आहेत. महेंद्र यादव यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले होते; मात्र त्यांना आता अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे.
सर्वेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना एमएमआरडीएकडून 45 लाख रुपये नुकसानभरपाई मंजूर करण्यात आली. यापैकी 5 लाख रोख देण्यात आले, तर प्रत्येकी 20 लाखांचे दोन धनादेश देण्यात आले आहेत. राज्य शासनाकडून जाहीर झालेली रक्कम अद्याप प्राप्त झालेली नाही. आता राजकुमार आणि महेंद्र यांच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त होत आहे.
रामधन यादव यांच्या नातेवाइकांना 35 ते 40 लाख रुपये नुकसानभरपाई राज्य शासन आणि एमएमआरडीएने जाहीर केली होती. त्यानंतर भरपाईची रक्कम अपुरी असून किमान 2 कोटी द्यावेत, अशी मागणी नातेवाइकांनी केली होती. त्याशिवाय मृतदेह ताब्यात घेण्यास त्यांनी नकार दिला होता; मात्र मृतदेह खराब होऊ लागला व घरी कुटुंबीय मृतदेहाची वाट बघत असल्याने नातेवाइकांनी तो ताब्यात घेतला. आज सकाळी हवाई मार्गाने तो मूळ गावी नेला जाणार आहे.