Low Response To Hawker Survey
भिवंडी : शहरात फेरीवाले सर्वेक्षण नोंदीसाठी मिळणारा अल्प प्रतिसाद व त्यामुळे भिवंडी शहरात फेरीवाला व ना फेरीवाला क्षेत्र जाहीर झाले नसल्याने शहरातील अनेक रस्त्यांवर फेरीवाल्यांनी बस्तान मांडल्याने रस्त्यांवर वाहतूक कोंडी व पादचाऱ्यांना चालण्यासाठी रस्ताच राहत नसल्याने कोंडमारा होत आहे.
शहरातील मंडई, बाजारपेठ, तीनबत्ती या नेहमी वर्दळीच्या ठिकाणी तसेच शांतीनगर, गैबीनगर, पद्मानगर, कामतघर, दिवानशाह दर्गा, खंडू पाडा, भंडारी चौक या मुख्य रस्त्यांवर नेहमीच फेरीवाले हातगाड्या यांचा गराडा असल्याने या सर्वच रस्त्यांवर वाहन चालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो तर या रस्त्यावरून चालणाऱ्या पादचाऱ्यांसाठी रस्ताच शिल्लक राहत नाही. शहरात फेरीवाला व ना फेरीवाला क्षेत्र नसल्याने या फेरीवाल्यांचे बस्तान थेट रस्त्यांवर बसले आहे. पण यांच्यावर ठोस कारवाई पालिका काही करताना दिसत नाही.
शहरातील फेरीवाला व ना फेरीवाला क्षेत्र जाहीर करण्यासाठी शहरातील फेरीवाल्यांचे सर्वेक्षण होणे गरजेचे आहे. पण, नाव नोंदणीसाठी फेरीवाले यांचा अल्प प्रतिसाद मिळत आहे.
शासनाकडून लोकसंख्येच्या प्रमाणात शहरात ८५०० फेरीवाल्यांचे सर्वक्षेण करण्याचे उद्दिष्ट दिले असताना शहरात दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान मार्फत ठेकेदार नेमून सर्वेक्षण सुरू केले आहे.
पण आजपर्यंत अवघे ३२०० फेरीवाल्यांची नोंद झाली आहे. अशी माहिती दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानचे संजय ठाकरे यांनी दिली आहे.