भिवंडी : भिवंडी शहरात पोलीस यंत्रणा नेहमीच अलर्ट असते. पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेमुळे शहरात शांतता व सुव्यवस्था कायम नांदत असून पोलिसांच्या मोहल्ला कमिटी, शांतता कमिटीच्या माध्यमातून हिंदू मुस्लिम भाईचारा प्रस्थापित करण्यात पोलीस यंत्रणांसह सेवाभावी संस्थांना यश आलेले आहे.
नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर भिवंडी पोलीस उपायुक्त कार्यालयाच्या कार्यकक्षेत असलेल्या सहा पोलीस ठाण्यांमध्ये पोलीस अधिकारी कर्मचारी अलर्ट मोडवर असून या सहाही पोलीस ठाण्यांच्या अखत्यारीत असलेल्या पोलीस चौक्यांमध्ये देखील पोलीस यंत्रणा सक्रिय करण्यात आली आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीत निर्माण झालेल्या तणावानंतर भिवंडीतील संपूर्ण पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर राहिली असून गणेशोत्सवानंतर येणाऱ्या प्रत्येक सणांमध्ये शहरात पोलीस गस्त वाढलेली आहे. त्यामुळे सध्या नवरात्री उत्सवात रात्री शहरातील विविध भागात पोलीस चौकांमध्ये पोलीस जागता पहारा देत आहेत.
पोलीस चौकांना योग्य ती व आवश्यक त्या सोयी सुविधा पोलीस प्रशासना व सेवाभावी संस्थांकडून पुरविण्यात येत आहेत. नारपोली, शांतीनगर, कोनगाव, भोईवाडा, निजामपुरा व भिवंडी शहर ही सहा पोलीस ठाणे येत असून या सहा पोलीस ठाण्याच्या कार्यकक्षेत सुमारे २२ पोलीस चौकी शहरात कार्यरत आहेत. शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पोलीस चौकी, त्यानंतर पद्मा नगर येथील पोलीस चौकी तसेच शांतीनगर गैबी नगर या मुस्लिम बहुल मोहल्यांमध्ये असलेल्या पोलीस चौक्यांसह इतर चौक्यांमध्ये पोलीस तळ ठोकून असतात.
शहरातील सर्व पोलीस चौक्यांवर दिवस रात्र पोलीस कर्मचारी तैनात केलेले असतात, शहरात वेळोवेळी रात्रीच्या गस्त व नाकाबंदीच्या वेळी त्या त्या परिसरात पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर असते. त्यामुळे आतापर्यंत शहरात शांतता व सुव्यवस्था कायम अबाधित राखण्यात पोलीस यंत्रणेला यश आलेले आहे.
- मोहन दहीकर, पोलीस उपायुक्त