

मुंबई : मेट्रो ३ भुयारी मार्गिकेवरील प्रवासी संख्या वाढवण्याच्या दृष्टीने या मार्गिकवरील मेट्रोच्या फेऱ्या वाढवण्याचा निर्णय एमएमआरसीएलने घेतला आहे. सोमवारी, ५ जानेवारीपासून नव्या फेऱ्या सुरू होतील.
नव्याने चालवण्यात येणाऱ्या वाढीव फेऱ्या सोमवार ते शनिवारपर्यंत चालवण्यात येणार आहेत. त्यामुळे या दिवसांच्या वेळापत्रकात बदल होईल. रविवारचे वेळापत्रक मात्र सध्या आहे तसेच राहणार आहे. सोमवार ते शुक्रवार या दिवसांमध्ये दररोज २९२ फेऱ्या चालवल्या जातील. यात २७ वाढीव फेऱ्यांचा समावेश असेल. सध्या शनिवारी २०९ फेऱ्या चालवल्या जातात. त्यात वाढ करून २३६ फेऱ्या चालवल्या जातील. रविवारी १९८ फेऱ्या चालवल्या जात आहेत, त्या कायम राहतील.
मेट्रोच्या फेऱ्या वाढवल्याने दोन फेऱ्यांमधील प्रतीक्षा कालावधी कमी होईल. त्यामुळे जास्तीत जास्त प्रवासी भुयारी मेट्रोकडे वळतील अशी अपेक्षा आहे.गेल्या वर्षी मे महिन्यात आरे ते बीकेसी मेट्रोचा विस्तार वरळीपर्यंत करण्यात आला. ऑक्टोबरमध्ये ही मेट्रो कफ परेडपर्यंत धावू लागली. १ ते ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत आरे ते कफ परेड या मार्गावर एकूण ३८ लाख ६३ हजार ७४१ प्रवाशांनी प्रवास केला.