

भिवंडी : भिवंडी तालुक्यातील गोरसई गावात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. कामवारी नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू झाला. तब्बल १८ तासांच्या अथक शोधकार्यानंतर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (NDRF) पथकाने त्यांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले. सागर परशुराम धुमाळ (वय ३०) आणि अक्षय परशुराम धुमाळ (वय २५) अशी या मृत भावांची नावे आहेत.
ही दुर्दैवी घटना शुक्रवारी (दि.२०) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली. सागर आणि अक्षय हे दोघे भाऊ गोरसई गावाजवळील कामवारी नदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेले होते. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने ते दोघेही बुडाले आणि बेपत्ता झाले.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ आणि भिवंडी अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. मात्र, रात्री अंधार पडल्याने शोधकार्य थांबवण्यात आले. आज (दि.२१) सकाळी सात वाजता एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पुन्हा शोधमोहीम सुरू केली. अखेर, सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास दोन्ही भावांचे मृतदेह शोधण्यात त्यांना यश आले.
एकाच घरातील दोन तरुण मुलांच्या मृत्यूने धुमाळ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण गोरसई गावावर शोककळा पसरली आहे. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी भिवंडीच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.