

उमरी तालुक्यातील भायेगाव येथे शनिवारी (७ जून) दुपारी एक हृदयद्रावक घटना घडली. धुणे धुण्यासाठी गोदावरी नदीकाठी गेलेल्या एका महिलेचा आणि तिच्या दोन मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये महानंदा भगवान हाणमंते (३६), तिची मुलगी पायल भगवान हाणमंते (१४) आणि ऐश्वर्या मालू हाणमंते (१२) यांचा समावेश आहे.
गोदावरी नदीला भरपूर पाणी आले होते आणि काठावर चिखल व गाळ साचलेला होता. याचमुळे धुणे धुत असताना महानंदा यांचा पाय घसरून त्या पाण्यात बुडू लागल्या. त्यांना वाचवण्यासाठी धावलेली पायलही पाण्यात पडली आणि शेवटी ऐश्वर्याही वाचवण्याच्या प्रयत्नात पाण्यात बुडाली.
या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. उमरी पोलीसही तत्काळ पोहोचले. मृतदेह शोधण्यासाठी बोटीचा, लांब बांबूचा आणि लोखंडी गळाचा वापर करत दोन तासांचे अथक प्रयत्न करण्यात आले.
अखेर दुपारी दोनच्या सुमारास तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. मृतदेह गोदाकाठावर आणून उमरी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले.
भायेगाव येथील मागासवर्गीय वस्तीतील बोअरवेल नादुरुस्त असल्यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे महिलांना धुणे धुण्यासाठी नदीवर जावे लागत होते आणि या पार्श्वभूमीवरच ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून, नागरिकांत हळहळ व्यक्त केली जात आहे. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष आनंदराव पाटील व सामाजिक कार्यकर्ते सुमेध कदम यांनी या घटनेबाबत माहिती दिली.