

महाड : तालुक्यातील कोकरेतर्फे गोवेल सावित्री खाडीच्या जेटीजवळ ७४ वर्षीय वृद्ध इसमाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.
आत्माराम दाजी आंबेकर असे बुडून मयत झालेल्या इसमाचे नाव असून आंबेकर हे १८ फेब्रुवारी रोजी घरातून अकरा वाजता बाहेर पडले. यानंतर त्यांचा मृतदेह सायंकाळी खाडीच्या पाण्यात सापडला. कोकरेतर्फे गोवेल सावित्री खाडीतील जेटीजवळ खाडी किनारी आंबेकर हे शौचालयाला गेले असता अचानक त्यांचा पाय घसरल्याने ते पाण्यात पडले व पाण्यात यांचा गुदमरून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. रुग्णवाहिका चालक रऊफ पठाण यांनी खाजगी रुग्णवाहिकेमध्ये सदरचा मृतदेह महाड ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदनाकरिता आणला असून महाड तालुका पोलीस ठाण्यात सदरच्या मृत्यूची अकस्मित मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. महाड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कुमार सानप व पोलीस उपनिरीक्षक के. एफ. खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.