

टोकावडे/मुरबाड शहर : काही वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला मुरबाड तालुक्यातील बांदलपाडा ठुणे मार्गावरील डोईफोडी नदीवरील दगडी बांधकामाचा पूल शुक्रवारी पहाटे अचानक मधोमध कोसळला. यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. पुलाचे पिलर कमकुवत झाल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत असून यावेळी रहदारीची वेळ नसल्याने मोठा अनर्थ टळला.
अतिशय जीर्ण असलेल्या या पुलाकडे येथील शासन प्रशासनाचे दुर्लक्ष झाले असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये मोठा संताप व्यक्त केला जात आहे. ग्रामस्थांच्या माहितीनुसार हा पूल सुमारे 50 वर्षे जुना होता. घटनेनंतर बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली. दरम्यान सुरक्षिततेच्या दृष्टीने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवला असून, तात्पुरत्या स्वरूपात नदीपात्रात भराव टाकून पर्यायी मार्ग तयार करण्यात आला आहे. सुमारे 50 वर्षापूर्वी पूल बांधण्यात आला होता. या पुलाची अवस्था दयनीय झाली होती. मात्र या पुलाकडे संबंधित अधिकारीवर्गाने वेळीच लक्ष दिले नसल्याने जीर्ण अवस्थेत असणाऱ्या बांदलपाडा ठुणे पुलाचा अखेर अंत झाला असून परिसरातील नागरिकांची प्रवास करण्यासाठी मोठी गैरसोय झाली आहे.