

ठाणे : ठाणे महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम 15 डिसेंबर रोजी जाहीर झाला असून 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर या कालावधीत अर्ज स्वीकारणार असल्याचे जाहिर केले. मात्र, निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांना पालिकेने नेमणुक केलेले निवडणुक निर्णय अधिकारीच कार्यालयात सापडत नसल्याचे वास्तव समोर आले आहे.
निवडणुकीसाठी आधीच अपुरा कालावधी असताना निवडणुक कार्यालयात अधिकारी व कर्मचारी उपलब्ध नसल्याच्या गंभीर बाबी कडे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते व माजी खासदार राजन विचारे यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे लक्ष वेधले आहे.
ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीकरीता 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार आहे. ह्या घोषित झालेल्या आदेशान्वये ठाणे महापालिकेने 17 डिसेंबर रोजी निवडणूक निर्णय अधिकारी तसेच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयीन पत्ता आणि महापालिका क्षेत्रातील 1 ते 33 प्रभागांकरीता निवडणुक निर्णय अधिकारी व अन्य अधिकाऱ्यांच्या मोबाईल क्रमांकासह नावांची आणि भेटण्याच्या कार्यालयीन पत्यांची जाहिर सुचना प्रसिद्ध केली.
परंतु प्रत्यक्षात त्या जागेवर अधिकारी नाही अथवा कोणतीही यंत्रणा कार्यान्वित झालेली दिसत नाही. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सुरुवात चार दिवसांवर आली आहे. तरी अधिकारी जागेवर भेटत नाहीत. तेव्हा, निवडणुक यंत्रणा कधी स्थापीत होणार? उमेदवारांच्या समस्या कधी मार्गी लागणार? असा सवाल ठाणे महापालिका क्षेत्रातील उमेदवारांना पडला आहे.
तरी आपणास विनंती आहे की ही निवडणूक अत्यंत पारदर्शकपणे व नियोजन तसेच शिस्तबद्धरितीने अंमलात आणावी, जेणेकरून उमेदवारांमध्ये प्रशासना विरोधात असंतोष निर्माण होता कामा नये, अशी मागणी होतेय.