

डोंबिवली : कल्याणमधील एका 68 वर्षीय वृद्धाला डिजिटल ॲरेस्टची भीती दाखवून दोघा भामट्यांनी ऑनलाईनद्वारे 23 लाख 50 हजार लुटल्याची घटना घडली आहे. गेल्याच आठवड्यात कल्याण पश्चिमेकडील पारनाका परिसरात राहणाऱ्या एका वृद्ध महिलेला आभासी अटकेची अर्थात डिजिटल ॲरेस्टची भीती दाखवून भामट्यांनी 63 लाख रुपये ऑनलाईनद्वारे उकळले होते. ही घटना ताजी असतानाच या घटनेची पुनरावृत्ती झाल्याचे पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीतून उघडकीस आले आहे. फसवणूक झालेल्या वृद्धाने दिलेल्या फिर्यादीनुसार महात्मा फुले चौक पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
कल्याण आणि उत्तर प्रदेशात वास्तव्य असलेल्या अब्दुस सबूर सरदारअली (68) या सेवानिवृत्ताला दोघा भामट्यांनी लक्ष्य केले. या वृद्धाला डिजिटल ॲरेस्टची भीती दाखवून 8 ते 12 डिसेंबर या कालावधीत 23 लाख 50 हजार रुपयांचा गंडा घातला आहे. सरदारअली यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोघाजणांविरुद्ध माहिती आणि तंत्रज्ञान कायद्याअन्वये गुन्हा दाखल केला आहे. यातील तक्रारदार सरदारअली हे कल्याण पश्चिमेकडे असलेल्या रहेजा कॉम्पलेक्स परिसरात राहतात. त्यांचे मूळ गाव उत्तर प्रदेशात बस्ती जिल्ह्यातील शंकरपूर येथे आहे.
भामट्यांनी सरदारअली यांना पंधरा दिवसांपूर्वी मोबाईलच्या माध्यमातून व्हीडिओ कॉल केले. व्हॉटसपद्वारे संपर्क केला. तुम्ही काही गैरव्यवहारांशी जोडले आहात. तुमचे व्यवहार संशयित आहेत. आम्ही तुम्हाला अटक करू शकतो. त्यामुळे या सगळ्या प्रक्रियेतून वाचविण्यासाठी आम्ही सहकार्य करतो, असे सांगून सरदारअली यांना सतत डिजिटल ॲरेस्टची भीती दाखवून त्यांच्या बँक खात्यामधून आरटीजीएसद्वारे एकूण 23 लाख 50 हजार रुपये वळते करण्यास सांगून सरदारअली यांची भामट्यांनी फसवणूक करण्यात आली आहे. दरम्यान घडलेला प्रकार सरदारअली यांनी आपल्या परिचितांना सांगितला. तेव्हा त्यांना आपली फसवणूक झाली असल्याची खात्री पटली. सरदारअली यांनी फसवणूक आणि पैशांच्या अपहारप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. या फिर्यादीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद पाटील या प्रकरणाचा चौकस तपास करत आहेत.
ज्येष्ठांमध्ये भामट्यांची दहशत
काही दिवसांपूर्वी डोंबिवलीत आपणास हयातीचे प्रमाणपत्र ऑनलाईन माध्यमातून काढून देतो, अशी थाप मारून भामट्याने सूर्यकांत पाटणकर यांच्याकडून 26 लाख रुपये उकळले आहेत. या घटनांप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यांतून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सायबर गुन्हेगारीमुळे दाखल होणाऱ्या अशा गुन्ह्यांमुळे पोलीसही चक्रावून गेले आहेत. तर दुसरीकडे भामट्यांकडून गेल्या काही महिन्यांपासून कल्याण-डोंबिवलीतील फडके रोड, पलावा, देसलेपाडा, सोनारपाडा, कल्याणमधील खडकपाडा, पारनाका, आदी परिसरांत राहणाऱ्या ज्येष्ठांना लक्ष्य केले जात असल्याने ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.