

बदलापूर : शनिवारी मध्यरात्री बदलापूर रेल्वे स्थानकात जोधपूर एक्सप्रेस अचानक थांबवण्यात आल्याने मध्य रेल्वेच्या बदलापूर व कर्जत दिशेने जाणाऱ्या लोकल गाड्या एका मागोमाग एक खोळंबल्या होत्या. त्यामुळे सुमारे दीड ते दोन तास रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने प्रवासी लोकलमध्ये अडकून पडले. अनेक प्रवाशांनी चालत बदलापूर रेल्वे स्थानक गाठले. त्यामुळे रात्री उशिरा घरी परतणाऱ्या चाकरमान्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
शनिवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास बदलापूर रेल्वे स्थानकात जोधपूर एक्सप्रेस अचानक थांबविण्यात आली. या एक्सप्रेसमधील एका डब्यात प्रवाशांचे साहित्य चोरीला गेल्याचा आरोप करीत संतप्त प्रवाशांनी दोन वेळा साखळी खेचल्याने बदलापूर स्थानकात ही एक्सप्रेस थांबविण्यात आली. एक्सप्रेस बदलापूर रेल्वे स्थानकात पोहोचल्यानंतर काही प्रवासी थेट रेल्वे रुळावर उतरले. त्यात एक्सप्रेस अचानक थांबवण्यात आल्यामुळे रात्रीच्या वेळेत कर्जत, खोपोली, बदलापूर स्थानकात येणाऱ्या लोकल गाड्या एकाच मार्गावर एकामागोमाग एक खोळंबून राहिल्या होत्या. त्यामुळे रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्रवाशांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यात प्रवासी आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये चर्चा सुरूच असताना अचानक काही वेळ थांबलेली एक्सप्रेस गाडी सुरू झाली. त्यामुळे संताप व्यक्त करण्यासाठी स्थानकावर उतरलेले अनेक प्रवासी फलाटावरच राहिल्याने पुन्हा गोंधळात भर पडली.
मागून खोपोली लोकल येत असल्याने रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी या प्रवाशांना तात्काळ फलाटावर घेतले. आणि त्यानंतर मागून येणाऱ्या खोपोली लोकलमध्ये या प्रवाशांना बसवून एक्सप्रेसपर्यंत सोडण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाचे जवानही त्यांच्यासोबत मार्गस्थ झाले. त्यानंतर खोळंबलेल्या लोकल गाड्या बदलापूर आणि कर्जत दिशेने सोडण्यात आल्या. मात्र या संपूर्ण गोंधळात मोठे हाल झाल्याने रात्री उशिरा घरी जाणाऱ्या चाकरमान्यांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागले. या गाडीमध्ये बसलेल्या प्रवाशांना वलसाड पासूनच मोठ्या मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप प्रवाशांनी बदलापूर रेल्वे स्थानकात आल्यावर केला.