

डोंबिवली : डोंबिवली पूर्वेतील आयरे रोड परिसरात जुना वाद उफाळून आल्याने एका तरूणाची निर्घृण हत्या झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. नरेंद्र जाधव उर्फ काल्या भाई या तरूणाची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
एकीकडे या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. तर दुसरीकडे मारेकऱ्यांना शोधण्यासाठी रामनगर पोलिसांची चार पथके वेगवेगळ्या दिशांना रवाना प्राथमिक तपासानुसार, पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून आकाश बीराजदार या तरूणाने आपल्या काही साथीदारासह काल्या भाई उर्फ नरेंद्र जाधव याच्यावर प्राणघातक हल्ला केला. हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने वार केल्यामुळे नरेंद्र जाधव गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असून प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदविण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणी मुख्य आरोपी आकाश विराजदार आणि त्याच्या साथीदारांचा शोध घेण्यासाठी चार स्वतंत्र पथके वेगवेगळ्या दिशांना रवाना करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.