

पंकज साताळकर
बदलापूर : बदलापूरमध्ये प्रस्थापित शिवसेनेच्या सत्तेला सुरुंग लागला असून भाजपचे कमळ अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या मदतीने फुलले आहे. यामुळे ठाण्यावर वर्चस्व असलेल्या शिवसेनेला धक्का बसला आहे.
बदलापुरात एकेकाळी पातकरांचे वर्चस्व होते ते वामन म्हात्रे यांनी शिवसेनेच्या बाजूने वळवले होते. मात्र या निवडणुकीत शिवसेनेला धक्का बसला आणि भाजपच्या रुचिता राजेंद्र घोरपडे या 64 हजार 604 मते मिळवून विजयी झाल्या तर शिवसेनेच्या उमेदवार विणा वामन म्हात्रे यांना 56 हजार 970 मतांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे जवळजवळ 7 हजार 634 मतांना त्यांचा पराभव झाला आहे. भाजपला राष्ट्रवादीशी युती केल्याचा फायदा झाला असून शिवसेनेचा अतिआत्मविश्वास पराभवाचे कारण ठरला आहे. शिवसेनेने या नगरपालिकेत 49 पैकी 24 जागा जिंकल्या आहेत. तर भाजपचे 22 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 3 विजयी झाल्याने नगराध्यक्ष पदासह भाजप राष्ट्रवादी युतीने 26 जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे या नगरपालिकेवर बहुमत भाजप युतीचे आले आहे.
कुळगांव बदलापूर नगर परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना विरुद्ध भाजपा - राष्ट्रवादी युती अशा झालेल्या सामन्यात भाजप राष्ट्रवादीने शिवसेनेला धक्का देत पालिकेवर सत्ता मिळवली आहे. तर भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रुचिता घोरपडे या 7634 मतांनी विजयी झाल्या आहेत. त्यांना एकूण 64 हजार 604 मध्ये पडली. तर विणा म्हात्रे यांना 56 हजार 970 मते मिळाली. या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे शिवसेनेचे 24 नगरसेवक निवडून आले आहेत. तर भाजपचे 22 नगरसेवक निवडून आले असून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे 3 नगरसेवक विजयी झाले आहेत.
बदलापूर पश्चिम परिसरात शिवसेनेने आपले गड शाबुत राखले आहेत. शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांचाही निसटता विजय झाला असून अवघ्या 32 मतांनी विजयी झाले आहेत. माजी नगराध्यक्षा जयश्री भोईर यांचा पराभव झाला आहे. तर भाजपमधून शिवसेनेत गेलेल्या हेमंत चतुरे, संजय भोईर, अविनाश भोपी यांच्या पत्नी अक्षदा भोपी आणि अंजली गिते यांचाही पराभव झाला आहे. बदलापूर शहरातील प्रभाग क्रमांक 3 कडे सर्वांचेच लक्ष लागून होते. यात वरुण म्हात्रे यांनाही दोन हजारांहून अधिकच्या फरकाने पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर शिवसेनेच्या प्रवीण राऊत यांनाही पराभवाचा सामना करावा लागला आहे. इतकच नाही तर अनेक माजी नगरसेवक पराभूत झाले आहेत. यामध्ये मुकुंद भोईर, प्रतीक्षा मरगज, प्रभाकर पाटील, राजेंद्र धुळे, सुरज मुठे, किरण बावस्कर, निशा घोरपडे, शोभा पाटील या शिवसेना-भाजप राष्ट्रवादी उमेदवारांचा समावेश आहे.
कुळगांव बदलापूर नगरपालिका निवडणुकीत बदलापूरकरांनी दिग्गजांना धक्का दिला असून पैशाच्या जोरावर निवडणूक लढणाऱ्यांनाही बदलापूरकरांनी चांगलीच चपराग दिल्याचे या निवडणूक निकालावरून पाहायला मिळाले. तर बदलापूरकरांनी तरुण चेहऱ्यांना पसंती दिली असून शिवसेना-भाजप आणि राष्ट्रवादी उच्चशिक्षित उमेदवारांना उमेदवारी दिल्याने त्यांना विजय अधिक सोपा झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. यात विशेष करून तेजश्री म्हसकर, संदेश ढमढेरे, आकीब कोहारी, सलोनी गायकवाड, रोहन पाटील, सौरव लाड, ज्योती डार्विन, संध्या मुठे , प्रियंका दामले, हर्षाली गायकवाड, सुगंधा पाटील, हर्षदा पवार, आदित्य पाटील, भाविता घोरपडे या नव्या चेहऱ्यांना बदलापूरकरांनी पसंती दिली आहे. तर अनेक दिग्गजांनी आपले गड कायम राखले आहेत.
म्हात्रेंच्या कुटुंबातील 6 पैकी 3 जण विजयी
शिवसेनेचे नेते वामन म्हात्रे यांच्या कुटुंबात 6 जणांना तिकीट मिळाल्याने अनेकांनी भुवया उंचावल्या होत्या. तसेच म्हात्रे यांच्यावर टीकाही झाली होती. मात्र, निवडणुकीत त्यांच्या कुटुंबातील तिघांचा पराभव झाला आहे. त्यांच्या पत्नी वीणा म्हात्रे यांना नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पराभवाचा धक्का पत्करावा लागला. तर, वामन म्हात्रे यांचा मुलगा वरुण म्हात्रे याला प्रभाग क्रमांक 3 ब मधून पराभव पत्कारावा लागला. तर, वामन म्हात्रे यांचा पुतण्या भावेश म्हात्रे याला प्रभाग क्रमांक 21 ब मधून पराभवाच स्वीकारावा लागला. वामन म्हात्रे स्वतः, त्यांचे बंधू तुकाराम म्हात्रे आणि तुकाराम म्हात्रे यांच्या पत्नी उषा म्हात्रे यांनाच विजय मिळवता आला.