

बदलापूर :कुळगांव-बदलापूर नगरपालिकेच्या बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादीचे स्वीकृत नगरसेवक प्रभाकर पाटील यांनी भाजपचे विधान परिषदेचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या बद्दल अपशब्द उच्चारल्याने ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे भाऊ शिवसेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रे आणि तुकाराम म्हात्रे यांनी प्रभाकर पाटील यांच्या विधानावर जोरदार आक्षेप घेतला. यावरून सभागृहात तुफान राडा झाला.
एकमेकांना खालच्या पातळीवर जाऊन शिव्या देण्यापासून ते खुर्च्याची फेकाफेक करण्यापर्यंत हा सारा प्रकार घडला. यामुळे पालिका सभागृहाचं कामकाज तहकूब करण्याची वेळ नगराध्यक्षांवर आली. त्यानंतर सभागृह बाहेर वातावरण तापलं. मात्र पाऊण तासाने पुन्हा तहकूब झालेली सभा स्वरूप करण्यात आली.
तेव्हा दोनही बाजूच्या सदस्यांनी सामोपचाराने घेत विषय पत्रिकेवरील मंजूर केले. मात्र सभा संपल्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या समर्थकांनी पालिका सभागृहा खाली गर्दी केली होती. पालिका सभागृहात राडा झाला असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतरही सभा संपल्यानंतर पुन्हा पालिकेच्या आवारात शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याने पोलिसांच्या अकार्यक्षमतेवर शिक्कामोर्तब झालं आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन पाटील हे स्वतः घटनास्थळी उपस्थित होते. मात्र तरीही पालिकेच्या आवारात 200 ते 250 जणांचा जमाव झाल्याने पोलीस घटना घडल्यापासून काय करत होते ? असा सवाल आता उपस्थित होत आहे.
बुधवारी कुळगांव-बदलापूर नगरपालिकेची सर्वसाधारण सभा साडेअकरा वाजता सुरू झाली. त्यावेळेस मागील विषयांचे इतिवृत्त वाचन करत असताना त्यात वर शिवसेनेचे नगरसेवक वामन म्हात्रे यांनी आक्षेप घेत, सभागृहात चर्चा न झालेले विषय प्रशासनाने इतिवृत्तात घेतल्याची बाब निदर्शनास आणून दिली. त्यावेळेस प्रभाकर पाटील यांनी उभं राहून विधान परिषदेतील शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या कामांची एक यादीच पत्र काढून दाखवली व त्यांनी केलेल्या कामाबाबत आक्षेपार्ह विधान केले.
त्यावरून वामन म्हात्रे आणि तुकाराम म्हात्रे यांनी पालिका सभागृहातच त्या विरोधात जोरदार हरकत घेतली. प्रभाकर पाटील यांनीही आपली भूमिका कायम ठेवल्याने पालिका सभागृहात वातावरण तप्त झाले होते.
दरम्यान तापलेलं वातावरण निवळवणसाठी नगराध्यक्षा रुचिता घोरपडे यांनी ही सभा तहकूब केली. दरम्यानच्या काळात प्रभाकर पाटील आणि वामन म्हात्रे यांच्या समर्थकांनी पालिका सभागृह बाहेर जमण्यास सुरुवात केली होती. मात्र पोलिसांना हा सारा प्रकार रोखता आला असता. पालिकेच्या आवारात झालेल्या राड्यामुळे बदलापूर शहरात वातावरण गढूळ होऊन राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघालं आहे.