बदलापूर : कुळगांव बदलापूर नगरपालिकेवर 2011 पासून शिवसेनेची एक हाती सत्ता आहे. पंधरा वर्षांपूर्वी असलेलं बदलापूर आणि आज बदलापूर शहरात झालेले प्रशस्त सिमेंट काँक्रीटचे रस्ते, पाणीपुरवठा योजना, भव्य प्रशासकीय इमारत यासह अंडरग्राउंड ड्रेनेज योजना आणि स्ट्रॉर्म वॉटर योजना अशा विविध योजना नगर विकास विभागाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आल्या आहेत. ज्यांनी काहीच विकास कामे केली नाहीत, ते आरोप करत आहेत. त्यामुळे आरोप प्रत्यारोप करणाऱ्यांना बदलापूरची जनता त्यांची जागा दाखवेल असा पलटवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बदलापूर येथे झालेल्या जाहीर सभेत केला.
बदलापूर शहराच्या विकासासाठी नगर विकास विभागाने 500 कोटीहून अधिक रुपयांचा निधी दिला आहे. माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांच्या नेतृत्वात शहरात अनेक विकास कामे झाली आहेत. ही विकास काम करत असताना बदलापूर शहराच्या विकासासाठी निधी कुठेही कमी पडणार नाही याची खबरदारी घेऊन मी वामन म्हात्रे आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या पाठीशी खंबीरपणे उभा होतो. त्यामुळे शिवसेनेने बदलापूर शहरात विकास कामांचा डोंगर उभा केला आहे. कुळगांव बदलापूर नगरपालिका निवडणुकांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांची बदलापूर पश्चिम येथील घोरपडे मैदान येथे भव्य प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती.
यावेळी शिवसेनेच्या थेट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार विणा म्हात्रे यांना प्रचंड बहुमताने निवडून देण्याचा आवाहन एकनाथ शिंदे यांनी केलं. तसेच बदलापूर आणि शिवसेना यांचा अतूट नातं असून या पुढील काळातही बदलापूरकर शिवसेनेने केलेल्या विकास कामांना साथ देतील आणि शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना विजयी करतील असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त करत वामन म्हात्रे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा कौतुक केलं. बदलापूर शहर एमएमआरडीए क्षेत्रातील एक महत्त्वाच शहर असून विकास कामासाठी भविष्यात कोणत्याही निधीची कमतरता पडू देणार नाही आणि त्याचे संपूर्ण जबाबदारी आपली असल्याचे मत यावेळेस एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.