

पालघर ः पालघर नगरपरिषद निवडणुकीत भाजपच्या दोन गटात राडा झाल्याने भाजपमधील अंतर्गत कलह समोर आला आहे. शुक्रवारी रात्री शहरातील लोकमान्य नगर भागात दोन्ही गट एकेमेकांना भिडले. पालघरमध्ये भूतदयेचे काम करणाऱ्या वैशाली चव्हाण आणि भाजपचे माजी शहर अध्यक्ष अशोक अंबुरे यांच्यात वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले.
खासदार डॉ. हेमंत सवरा आणि भाजपचे जिल्हा प्रमुख भरत राजपूत यांना दोन्ही गटात मध्यस्ती करण्यात यश आले नाही. दोन्ही गटांकडून परस्पर विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शुक्रवारी दुपारी वैशाली चव्हाण त्यांच्या समर्थकांसह भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कैलास म्हात्रे यांच्या जुना पालघर येथील कार्यालयात गेल्या होत्या. यावेळी कार्यालयात उपस्थित असलेल्या अशोक आंबुरे यांच्या सोबत शाब्दिक चकमक उडाली होती.
अंबुरे निघून गेल्यानंतर वैशाली चव्हाण यांनी त्यांचे म्हणणे कैलास म्हात्रे यांच्या समोर मांडले होते. रात्री बारा वाजण्याच्या सुमारास लोकमान्य नगर भागात जखमी श्वानाला रेस्क्यू करण्यासाठी वैशाली चव्हाण दुचाकी वरून जात असताना अशोक अंबुरे यांनी कमेंट पास केल्याने माघारी फिरत जाब विचारला असता अशोक अंबुरे यांनी वैशाली चव्हाण यांच्या सोबत गैरवर्तन केले. त्यांच्या हातातील मोबाईल फोन खेचत मारहाण केल्याचा आरोप वैशाली चव्हाण यांनी केला आहे. यावेळी चव्हाण यांच्या समर्थकांनी मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला असता अंबुरे समर्थक आणि वैशाली चव्हाण समर्थकांमध्ये जोरदार राडा झाला.
राड्यामुळे दोन्ही गटातील तरुणांना दुखापत झाली आहे. त्यानंतर दोन्ही गट पोलीस ठाण्यात पोहोचले आणि एकमेकां विरोधात तक्रारी केल्या. दोन्ही गट भाजपचे असल्यामुळे मध्यस्तीसाठी शनिवारी दुपारी खासदार डॉ हेमंत सवरा आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत पालघर पोलीस ठाण्यात पोहोचले होते.काही तास खल केल्यानंतरही समझोता होत नसल्याने खासदार आणि जिल्हाध्यक्ष माघारी फिरले. पालघर पोलीस ठाण्यात दोन्ही गटांकडून परस्पर विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शुक्रवारी रात्री कार्यालयातील कामकाज संपवून घरी जात असताना वैशाली चव्हाण आठ दहा जण घेऊन आल्या,माझं तिकीट कापलं असे सांगत मला शिवीगाळ केली.माझ्यावर हल्ला केला,दोघा कार्यकर्त्यांना दगड लागले, मारहाण करून पळून गेले.विरोधकांना पराजय दिसत असल्यामुळे भ्याड हल्ला झाला आहे.याचा निषेध करतो.
अशोक अंबुरे, माजी शहराध्यक्ष, भाजप, पालघर