

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
हिमालयीन राज्यांमध्ये पाऊस आणि बर्फवृष्टीचा नवा टप्पा सुरू झाला आहे. हिमाचल प्रदेशातील शिमला आणि मनाली येथे हंगामातील पहिली बर्फवृष्टी झाली असून, साडेतीन महिन्यांपासून सुरू असलेला कोरडा काळ अखेर संपुष्टात आला आहे. बर्फाच्छादित डोंगररांगा आणि थंडीमुळे पर्यटनस्थळांवर पुन्हा एकदा हिवाळ्याचे सौंदर्य खुलले आहे.
उत्तर भारतात सक्रिय झालेल्या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे हवामानात अचानक बदल झाला आहे. राजस्थान, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि दिल्लीमध्ये गुरुवारी उशिरापासून पावसाला सुरुवात झाली असून, अनेक भागांत जोरदार वारे वाहत आहेत. या बदलामुळे अनेक जिल्ह्यांतील तापमानात लक्षणीय घट नोंदवली गेली आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, 26 जानेवारी रोजी आणखी एक शक्तिशाली वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय होण्याची शक्यता आहे. यामुळे उत्तर भारतातील सुमारे 9 राज्यांमध्ये पावसाचा, तर पर्वतीय भागांत जोरदार बर्फवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काही भागांत तापमान आणखी घसरण्याची, दव पडण्याची आणि थंडीच्या लाटेची शक्यता आहे.
वेस्टर्न डिस्टर्बन्स म्हणजे काय?
वेस्टर्न डिस्टर्बन्स पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा आणि ढगांच्या एका हवामान प्रणालीचा प्रकार आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय झाल्यास हिमालयीन भागात बर्फवृष्टी, तर उत्तर भारतातील मैदानी प्रदेशांत पाऊस पडतो. यामुळे तापमानात घट होऊन थंडी, दव आणि शीतलहरीसारख्या स्थिती निर्माण होतात.