डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा
बदलापूर रेल्वे स्थानकात गोळीबार झाल्याची घटना ताजी असताना लोहमार्ग पोलिसांनी कसारा रेल्वे स्थानकातून देशी कट्ट्यासह एका सराईत गुन्हेगाराला शुक्रवारी (दि.13) जेरबंद केले आहे. स्थानकावर सुरू असलेल्या गस्ती दरम्यान पोलिसांनी या गुन्हेगाराला बेड्या ठोकल्या. आकाश श्रीवंत असे कट्टाधारी गुन्हेगाराचे नाव असून त्याच्याकडून गावठी बनावटीचा लोडेड कट्टा हस्तगत करण्यात आला आहे.
यातील आणखी एक आरोपी आकाश याच्या विरोधात याआधी देखील नाशिक रोड पोलिस ठाण्यात पोस्को आणि आर्म्स ऍक्ट अंतर्गत गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. बदलापूर रेल्वे स्थानकात गोळीबार झाल्याच्या घटनेनंतर शुक्रवारी कसारा रेल्वे स्थानकात गावठी कट्टा घेऊन फिरणाऱ्या आकाश श्रीवंत नावाच्या तरुणाला कल्याण लोहमार्ग पोलिस आणि रेल्वे सुरक्षा दलाने अटक केली आहे. रेल्वे स्थानकावर नियमित गस्तीदरम्यान हा प्रकार उघडकीस आला. आकाश श्रीवंत हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध नाशिक रोड पोलिस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार आणि अग्नीशस्त्र कायद्यांतर्गत गुन्हे दाखल आहेत. गस्तीवर असलेल्या पोलिसांना कसारा स्थानकात संशयास्पदरीत्या फिरणारा आकाश दिसला. चौकशीसह अंगझडती घेतली असता केली त्याच्याकडे देशी बनावटीचा कट्टा आढळून आला. पोलिसांनी कट्टा जप्त करून त्याला तात्काळ बेड्या ठोकल्या.
बदलापूर स्थानकात नुकताच घडलेला गोळीबार आणि आता कसारा स्थानकात गावठी कट्टा सापडल्याने रेल्वे स्थानकांमधील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे पोलिसांनी गस्त वाढवली असून, या प्रकारानंतर रेल्वे स्थानकांवरील तपासणी मोहीम अधिक तीव्र केली जाणार आहे. पुढील तपासासाठी आकाशला कल्याण लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून त्याच्या अन्य गुन्ह्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे.