

गंगाखेड : भंगार माल विक्रीच्या नावाखाली वाहनातून गोमांसाची वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर गंगाखेड पोलिसांनी कारवाई करत दोघांना अटक केली. शहरातील परळी नाका येथे नाकाबंदी दरम्यान मंगळवारी (दि.१०) मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत १० हजार किलो वजनाचे गोमांस व टेम्पो असा २५ लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या सूचनेनुसार शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. परळी नाका नाकाबंदीदरम्यान संशयास्पद वाटणाऱ्या (एमएच- २० एल- ९१०७) या टेम्पोला पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला. यावेळी टेम्पोतील मालाबद्दल विचारणा केला असता टेम्पोतील दोघांनी भंगार व स्क्रॅपचा माल असल्याचे सांगितले. मात्र वाहनातून दुर्गंधी येत असल्याने पोलिसांचा संशय बळावला. वाहनाची बारकाईने तपासणी केली असता भंगार सामानाच्या गोण्या व त्यापलीकडे वाहनांमध्ये बर्फामध्ये खचाखच भरलेले जनावरांचे गोमास आढळले. वाहन चालकास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने गोमांंस असल्याचे सांगितले.