

ठाणे : राज्य एटीएस पथकाने सोमवारी (दि.2) सकाळी भिवंडी तालुक्यातील पडघा गावात पूर्व तयारीनिशी छापेमारी करून दिवसभर सर्च ऑपरेशन राबवले. मुंबई बॉम्बस्फोटात सहभागी असलेला कुख्यात दहशतवादी साकीब नाचण याच्या घरासह गावातील बावीस घरांची झाडाझडती एटीएस पथकाने घेतली.
सर्च ऑपरेशनमध्ये तलवारी, सुरे, कट्टरता पसरवणारी भाषणे, पत्रके व इतर दस्तावेज जप्त करण्यात आली आहेत. या कारवाईत दोघांना अटक करण्यात आली असून दहाहून अधिक संशयितांना एटीएस पथकाने चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तान व अतिरेकी संघटनांशी संबंधित गद्दारांची देशभरात धरपकड सुरू झाली आहे. अतिरेक्यांशी व पाकिस्तानशी संबंधित असणाऱ्यांच्या जुन्या फाईली ओपन करण्यात आल्या असून संशयितांवर तपास यंत्रणांनी करडी नजर रोवली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई-ठाण्यातसह राज्यभरात यापूर्वी पकडले गेलेले अतिरेकी व त्यांच्याशी संबंधित नेटवर्कची पाळेमुळे शोधण्यास पुन्हा एकदा केंद्रीय तपास यंत्रणांसह राज्य दहशतवाद विरोधी पथकाने सुरवात केली आहे. याच कारवाई अंतर्गत सोमवारी सकाळीच राज्य एटीएसच्या 25 अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने ठाणे ग्रामीण पोलिसांच्या मदतीने भिवंडी तालुक्यातील पडघा गावात सर्च ऑपरेशन राबवले. यावेळी स्थानिक पोलिसांसह तीनशे ते साडे तीनशे पोलिसांच्या सुरक्षा छावणीत एटीएस पथकाने गावातील बावीस घरांची तपासणी केली. त्यात तलवारी, सुरे, देशविरोधी कारवायांशी संबंधित दस्तावेज, मोबाईल व इतर साहित्य मिळून आले. एटीएस पथकाने या कारवाईत दोन जणांना अटक केली असून दहाहुन अधिक जणांना सोमवारी सायंकाळ पर्यंत चौकशीसाठी ताब्यात घेतले होते अशी माहिती सूत्रांनी दिली. ही कारवाई सोमवारी सायंकाळी उशिरापर्यंत सुरूच होती.