

डोंबिवली : कल्याण-कसारा रेल्वेमार्गावरील आंबिवली स्टेशनजवळ सर्व सेवा केंद्र नावाने व्यवसाय करणाऱ्या सत्यभामा अछेलाल जैसवाल यांचा मोबाईल घेऊन पळ काढणाऱ्या चोरट्याला लोकांनी पकडले. त्यानंतर यथेच्छ बदडून खडकपाडा पोलिसांच्या हवाली केले. गुरूवारी दुपारच्या सुमारास जैसवाल यांच्या सेवा केंद्रात उल्फान हाकिमदिन मोहम्मद (१८, रा. उत्तर प्रदेश, सध्या कल्याणातील फिरस्ता) हा तेथे आला. त्याने सत्यभामा यांच्याकडे गाळा भाड्याने मागितला. त्याकरीता त्याच्या आधारकार्डचा फोटो मोबाईलवर मागविण्याच्या बहाण्याने सत्यभामा यांच्याकडे त्यांचा मोबाईल मागितला.
मोबाईल हाती लागताच चोरट्याने तेथून धूम ठोकली. हे पाहून सत्यभामा यांनी आरडाओरडा केल्यानंतर रस्त्यावरील लोकांनी पाठलाग करत चोरट्याला पकडले आणि चोपून पोलिसांच्या ताब्यात दिले. या चोरट्याने आतापर्यंत केलेल्या चोऱ्यामाऱ्यांचा तपशील जाणून घेऊन पोलिस अधिक तपास करत आहेत.
कल्याणच्या विजय पाटील ओपन प्लॉट जवळ असलेल्या जिओ टॉवरच्या नेटवर्क बॉक्समधील २ लाख ९३ हजार ४३५ रूपये किंमतीचे जिओ नेटवर्कचे बीबीयू कार्ड अज्ञात चोरट्यांनी लांबविले. या संदर्भात खडकपाडा पोलिस ठाण्यात संदीप भोईर यांनी फिर्याद दाखल केली आहे. या संदर्भात अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक व्ही.आर. भालेराव करत आहेत.
कचोरेगावात राहणाऱ्या साक्षी राठोड यांचा मोबाईल चाँद व शक्ती रमेश नाडर यांनी चोरल्याची तक्रार टिळकनगर पोलिस ठाण्यात केली आहे. तक्रारदार साक्षी राठोड यांची मैत्रीण काश्मीरा हिच्याकडे चाँद याने ५ हजार रूपये मागितले. मात्र पैसे दिले नाहीत म्हणून चाँद याने श्रीकृष्णनगरातील साई सदन चाळीत राहणाऱ्या साक्षी राठोड यांच्या घरामध्ये चार्जिंगला लावलेला मोबाईल उचलून पोबारा केला. चाँद याने आपला मोबाईल चोरल्याची तक्रार टिळकनगर पोलिस दाखल केली आहे. या संदर्भात पोलिस अधिक तपास करत आहेत.
कल्याण पश्चिमेकडील वलीपिर रोडला असलेल्या झोया कॉम्प्लेक्समध्ये राहणाऱ्या फैयाज शेख यांच्या मालकीची स्कूटर अज्ञात चोरट्याने चोरून नेली. या प्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिस स्कूटर चोराचा शोध घेत आहेत.
पश्चिम डोंबिवलीतील दिनदयाळ रोडला असलेल्या आनंदनगर सबस्टेशनमधून ८५ हजार रूपये किंमतीच्या १७ केबल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या. या संदर्भात अमोल डोमाळे यांनी विष्णूनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.