

बदलापूर : बदलापूरपासून सुमारे 3 किमी अंतरावर असलेल्या आंबेशिव गावात बिबट्याने दोन बकऱ्यांची शिकार केल्याचे समोर आले आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. तर वनविभागाने बिबट्याचा शोध घेण्यासाठी वनविभागाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
ठाणे जिल्ह्यातील मुरबाड, अंबरनाथ, कल्याण या तालुक्यातील जंगल भागात अनेकदा बिबट्याचा वावर दिसून आला आहे. अंबरनाथच्या तालुक्यात उल्हास नदी लगतच्या वसत शेलवली, तीन झाडी परिसरात, बदलापूरजवळील बारवी नदी जवळील काही गावांमध्येही बिबट्याचा वावर दिसून आला आहे. आता पुन्हा एकदा अंबरनाथ तालुक्यातील आंबेशिव गावात बिबट्या आढळून आला आहे.
दोन दिवसांपूर्वी बिबट्याने या गावातील एका शेतकऱ्याच्या दोन बकऱ्या फस्त केल्या होत्या. बिबट्याने हा हल्ला केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर मंगळवारी सकाळी गावातील एका शेतकऱ्याच्या घरामागे बिबट्याच्या पाऊलखुणा आढळून आल्या. त्याशिवाय काही ग्रामस्थांना बिबट्या आढळून आला. याबाबतच माहिती मिळताच वनविभाग ॲॅक्शन मोडवर आला आहे. बिबट्याचा शोध घेण्यासाठी वन विभागाच्या पथकाने गावात तळ ठोकला आहे.
वनविभागाकडून जनजागृती
या भागात कॅमेरे बसवून बिबट्यावर नजर ठेवली जाणार आहे. तसेच त्याला नैसर्गिक अधिवासात नेण्यासाठी उपाययोजना केल्या जाणार आहेत. त्यानंतरही बिबट्या या भागातून गेल्यास त्याला जेरबंद करण्यात येणार असून त्यासाठीही वनविभागाच्या हालचाली सुरू आहेत.
बिबट्या आढळल्यास ग्रामस्थांनी घाबरून न जाता कोणती काळजी घ्यावी, याबाबत वनविभागाने जनजागृती केली असल्याचे वन अधिकारी वैभव वाळींबे यांनी सांगितले. बिबट्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात परत जावे यासाठी वन विभागाने मोहीम हाती घेतली असल्याचेही वाळिंबे यांनी सांगितले.