ठाणे : अंबरनाथ-बदलापूर रेल्वे स्थानका बाहेर असलेल्या गर्द झाडी, गवतामुळे दिवसाढवळ्या सरपटणारे प्राणी मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. मण्यार, सूर्यकांडरसारखे सर्प गवताच्या मदतीने प्लॅटफॉर्मवर, रेल्वे पुलाखाली येतात तसेच रेल्वे स्थानकावर इतर ठिकठिकाणी आढळत आहेत. यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
अंबरनाथ-बदलापूर रेल्वे स्थानकातून नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी रेल्वे स्थानकाबाजूचा परिसर स्वच्छ करण्याची मागणी रेल्वे प्रशासनाकडे केली होती. मात्र रेल्वे प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याची तक्रार अनेक प्रवाशांनी केली.
ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुका निसर्ग आणि धार्मिक स्थळांसाठी ओळखला जातो. अंबरनाथ तालुक्यातील बहुतांश भाग डोंगर, गर्द झाडीने व्यापलेला आहे. तसेच उर्वरित भागात अंबरनाथ आणि बदलापूर शहर वसलेले आहे. अंबरनाथ आणि बदलापूर शहर हळूहळू विकसित होत असलेतरी अंबरनाथ तालुक्यात ग्रामीण भाग अधिक आहे. व अंबरनाथ तालुक्यात शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भाग जास्त असल्यामुळे इथल्या नैसर्गिक वातावरणातले जीवजंतू अनेक ठिकाणी आढळतात. अलीकडेच डोंबिवलीत सर्पदंशामुळे 2 मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांमधून रेल्वे स्थानक परिसर स्वच्छता कण्याची मागणी होत आहे.
सापांच्या विषारी आणि बिनविषारी अशा 2 मुख्य प्रजाती आहेत. परंतू प्रत्येकालाच साप विषारी आहे की, बिनविषारी आहे, हे ओळखता येत नाही. त्यामुळे सर्पदंश झाल्यास अनेकांचा मृत्यू होतो. त्यामुळे असे अनेक जातींचे साप अंबरनाथ-बदलापूर रेल्वे स्थानकात आणि आजूबाजूच्या परिसरात गारवा शोधत फिरत असतात. त्यामुळे एखाद्या प्रवाशाचे लक्ष्य नसताना एखाद्याला सर्पदंश झाल्यास प्रवाशाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, याचा विचार करून रेल्वे प्रशासनाने परिसर स्वच्छता करावी, अशी मागणी होत आहे.
परिसर स्वच्छ करण्याची मागणी
अंबरनाथ-बदलापूर रेल्वे स्थानकांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी स्टेशनबाहेरील परिसर स्वच्छ करण्याची आणि हिरवळ कमी करण्याची मागणी रेल्वे प्रशासनाकडे केली होती; परंतु रेल्वे प्रशासनाने या चिंताजनक बाबींकडे दुर्लक्ष केले असून अद्यापही कोणतीही साफसफाई केली नसल्याची प्रवाशांची तक्रार आहे.