

मुंबई : आता निवडणुका झाल्यास पराभवाला सामोरे जावे लागेल अशी शंका असल्यामुळेच विरोधक निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी करत आहेत. त्यासाठीच मतदार याद्यांचे कारण पुढे केले जात आहे. मात्र, विरोधकांचा हा कांगावा निरर्थक आहे. विरोधकांनी त्यांच्या मतदारसंघात केलेला घोळ पुराव्यासकट जनतेसमोर मांडू, असा इशारा देतानाच आयोगाने मतदार याद्यांवर हरकती सूचना मागवल्या होत्या तेव्हा एकही हरकत का घेतली नाही ? असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना केला आहे. त्याचवेळी मुंबईत महायुती म्हणूनच निवडणुकीला समोरे जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
दिवाळीनिमित्त वर्षा निवासस्थानी पत्रकारांसोबत अनौपचारिक संवाद साधताना मुख्यमंत्री बोलत होते. विरोधक निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी करत आहेत कारण त्यांना आता निवडणुका अडचणीच्या वाटत आहेत. विधानसभेत आम्हाला जे यश मिळाले ती लाट अजून कायम आहे असे त्यांना वाटते. कदाचित अजून सहा महिने गेले तर काही प्रश्नांमुळे, अडचणींमुळे कुठे तरी फायदा होईल आणि आपण निवडून येऊ, असे विरोधकांना वाटत आहे. त्यामुळे निवडणुका सहा महिने पुढे ढकलण्याची मागणी केली जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
निवडणुका पुढे ढकलण्याकरता कोणतेही ठोस कारण विरोधकांकडे नाही. फक्त गैरसमज पसरवण्याकरता हा विषय मांडला जात आहे. मात्र, आम्हीही तयारी केली आहे. विरोधकांवर बॉम्ब टाकणार असून लोकसभा निवडणुकीच्या काळात त्यांना ज्या ज्या मतदारसंघात लाभ झाला ते सर्व पुराव्यानिशी लोकांसमोर मांडू, असा इशारा मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिला.
मतदार याद्यांमध्ये सुधारणा व्हावी ही माझीही भूमिका आहे. त्यासाठी याआधीच मी निवडणूक आयोगाकडे गेलो. मी स्वत: 2012 साली या संदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तो खटला अद्यापही सुरू आहे. मात्र , विरोधक मतदार याद्यांबाबत जो कांगावा करीत आहेत तो निरर्थक आहे. ज्यावेळी प्रारूप याद्या येतात त्यावेळी निवडणूक आयोगाकडून त्या अंतिम करण्यापूर्वी हरकती वा सूचना मागवल्या जातात. त्यावेळी विरोधकांनी एकही हरकत घेतलेली नाही.
याद्या सुधारल्या पाहिजेत या त्यांच्या मताशी मी शंभर टक्के सहमत आहे. पण याद्या सुधारण्यालाही ते विरोध करतात, बिहारमध्ये त्यांनी असाच प्रकार केला, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. मतदारयाद्या अचूकच पाहिजेत असा माझाही आग्रह आहे. दुबार नावे सगळीकडेच आहेत. गेल्या पंचवीस वर्षांपासून अशा पद्धतीनेच याद्या आहेत, असेही फडणवीस यांनी याबाबत बोलताना सांगितले.
गेली काही वर्षे राज्यातील राजकीय वातावरण गढूळ झाले आहे यासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, सध्या तसे चित्र नाही. आधीची राजकीय अनिश्चितता आता नाही, राजकीय स्थैर्याची स्थिती आहे. तसेच माझे 99 टक्के नेत्यांशी सौहार्दाचेच संबंध आहेत. कोणत्याही नेत्यासोबत मी चहा पिण्यासाठी आरामात बसू शकतो. वैयक्तिक संबंध निदान मी तरी जपतो, असेही मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.
मुंबईत महायुती
मुंबई महापालिका निवडणूक आम्ही महायुती म्हणूनच लढणार आहोत. या ठिकाणी 100 हून अधिक जागा मिळतील व बहुमताचा आकडा आम्ही निश्चित पार करू त्यामुळे महापौर महायुतीचाच असेल. पण, इतर ठिकाणी स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेणार आहोत. काही ठिकाणी आम्ही महायुती म्हणून लढलो तर विरोधकांच्या काही जागा वाढू शकतात. त्यामुळे उगाच भावनिक न होता स्वतंत्र लढू. ज्या ठिकाणी तिघांचीही ताकद आहे, जिथे एकत्र लढून काहीही उपयोग होणार नाही. त्या ठिकाणी स्वतंत्रच लढले पाहिजे.
कोणत्याही परिस्थितीत विरोधकांना फायदा होऊ देणार नाही. ठाणे महापालिकेबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारूनच निर्णय घेतला जाईल. ते जर म्हणतील, युतीत लढू तर युतीत अन्यथा स्वतंत्र निवडणुकांना सामोरे जाऊ, मीरा भाईंदर महापलिकेबाबतही आढावा घेऊन निर्णय घेतला जाईल. नवी मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड महापालिकेत स्वतंत्र निवडणूक लढवू, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
गुजरात पॅटर्न आणि मंत्र्यांचा आढावा
गुजरातमध्ये अख्खे मंत्रिमंडळच बदलण्यात आले, महाराष्ट्रातही हाच पॅटर्न होणार का असे विचारले असता, अद्याप राज्यात वर्ष पूर्ण झाले नाही. पण मंत्र्यांच्या कामाचा आढावा निश्चित घेण्यात येई्ल. त्यानंतर फेरबदलाबाबत निर्णय केला जाईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
निवडणुकीनंतरही ठाकरे बंधूंनी एकत्र रहावे
आधी माझ्यावर पक्ष फोडल्याचे आरोप करायचे. आता दोघा ठाकरे बंधूंना मी एकत्र आणले असे म्हणत आहेत. दोघा भावांना जर मी एकत्र आणले, असे ते म्हणत असतील तर मला आनंदच आहे. निवडणुकांनंतरही दोघे ठाकरे बंधू एकत्रच रहावेत अशाच माझ्या शुभेच्छा असल्याचेही फडणवीस यावेळी म्हणाले.
तर लोक मारतील
राज्यात 4-5 वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. त्यामुळे सर्व पक्षांचे स्थानिक कार्यकर्ते निवडणुका लढवण्यास प्रचंड इच्छूक आहेत. अशात निवडणुका घेतल्या नाहीत तर हे लोक मारतील, असे मुख्यमंत्री फडणवीस यावेळी मिश्किलपणे म्हणाले. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळापत्रकानुसारच होतील. आधी नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि त्यानंतर महापालिका निवडणुका होतील, असेही फडणवीस त्यांनी स्पष्ट केले.