

वॉशिंग्टन डी सी: अनिल टाकळकर
वॉशिंग्टन डी सी : मराठी रंगभूमीचे ज्येष्ठ आणि लोकप्रिय अभिनेते प्रशांत दामले यांनी आपल्या अमेरिकेच्या दौऱ्यात आपल्या रंगभूमी कारकीर्दीतील 13 हजार 125 वा प्रयोग पूर्ण करून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे . वॉशिंग्टन मराठी कला मंडळाने खास दिवाळीनिमित्त त्यांच्या शिकायला गेलो एक या विनोदी नाटकाचा प्रयोग आयोजित केला होता . त्यात या विक्रमाची नोंद घेण्यात आली . दिवाळीत झालेला हा प्रयोग हाऊस फुल्ल होता .अमेरिका स्थित मराठी प्रेक्षकांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला.
चालू ऑक्टोबर 2025 मध्ये अमेरिकेतील 16 प्रमुख शहरांमध्ये हे नाटक सादर केले जात असून हाही येथील बृहन महाराष्ट्र मंडळाने केलेला नवा विक्रम आहे . साधारणतः महिन्यात 4 ते जास्तीत जास्त 10 मराठी नाटकाचे प्रयोग आयोजित मंडळातर्फे केले जातात . त्यामुळे 16 हा सर्वाधिक मोठा आकडा मानला जातो . या दौऱ्यात बॉस्टन, ऑस्टिन, फ्लोरिडा, सिएटल, बे एरिया, ह्यूस्टन, शिकागो, डेट्रॉईट, वॉशिंग्टन डी.सी., पिट्सबर्ग, डॅलस, रॅली आणि न्यू जर्सी इत्यादी शहरांचा समावेश आहे. 31 तारखेला त्यांच्या नाटकाची टीम मुंबईत परतत आहे .
वॉशिंग्टन मराठी कला मंडळाचे यंदाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष असून त्यानिमित्ताने हर्डन हायस्कुल मध्ये दिवाळी उत्सवाच्या आयोज़नाचा भाग म्हणून या नाटकाचे सादरीकरण 19 ऑक्टोबर ला झाले . या मंडळाचे अध्यक्ष मिलिंद प्रधान यांच्या पुढाकाराने याचे आयोजन करण्यात आले . यावेळी झालेल्या काही सत्काराच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पदाधिकारी अर्चना ढोरे यांनी केले .
या नाटकानंतर सुग्रास महाराष्ट्रीय भोजनाचाही आस्वादही सुमारे 1200 हुन अधिक उपस्थितांनी घेतला . नाटकाच्या प्रयोगानंतर प्रशांत दामले यांनी प्रेक्षकांशी हितगुज केले अमेरिका , कॅनडा , ऑस्ट्रोलिया आदी शहरांमध्ये मराठी नाटकांचे प्रयोग करणे खूप खर्चिक आहे . पण काही प्रयोजकांमुळे आणि अमेरिकेतील रसिक मराठी प्रेक्षकांनी दिलेल्या भरघोस पाठींब्याने हे शक्य झाले . डेट्रॉईट मधील प्रयोगाच्या वेळी तर लोकं 3 ते 4 तासांचा प्रवास करून हे नाटक बघायला आवर्जून आले . त्यांचे आशीर्वाद आणि पाठबळ मिळणे हे मोठे भाग्य आहे , अशी कृतज्ञतेची भावना त्यांनी बोलून यावेळी बोलून दाखविली.
“शिकायला गेलो एक” हे नाटक एका आदर्शवादी शिक्षक आणि त्याच्या बंडखोर विद्यार्थ्याच्या नात्यावर आधारित आहे. प्रशांत दामले आणि हृषीकेश शेलार यांच्या जोडीने रंगमंचावर रंगत आणली असून, या सादरीकरणाने प्रेक्षकांना हास्याबरोबरच अंतर्मुख होऊन विचार करायला लावले आहे. प्रशांत दामले यांनी त्यांनी आपल्या सोशल मीडियावर लिहिले आहे.
“माझ्या रंगभूमीच्या प्रवासातील हा क्षण खूपच भावनिक आहे. 13125 वे नाटक परदेशात, इतक्या मराठी प्रेमींसमोर सादर करणं, हे केवळ भाग्य नव्हे, तर आपल्या सगळ्यांच्या प्रेमाचं आणि आशीर्वादाचं फलित आहे. प्रत्येक शो म्हणजे एक नवीन शिकवण आहे. ‘शिकायला गेलो एक’ खरं तर आजही मीच शिकतो आहे.”
दामले पुढे म्हणाले, प्रत्येकपरदेशातील सादरीकरण म्हणजे मराठी संस्कृतीला जगभर जोडणारा एक पूल आहे. अमेरिकेतील मराठी प्रेक्षकांसमोर हे नाटक सादर करताना मला अपार समाधान वाटले कारण हास्य आणि संस्कृतीचा अभिमान हे दोन्ही एकाच रंगमंचावर अनुभवायला मिळाले, असेही प्रशांत दामले यावेळी म्हणाले.