

Ambarnath Accident News
अंबरनाथ : अवैध विद्यार्थी वाहतुकीला आळा बसावा यासाठी कल्याण आरटीओने कारवाईचा बडगा उगारला आहे. याच कारवाईदरम्यान अवैध विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या व्हॅन ने कारवाई पासून बचाव करण्यासाठी विरुद्ध दिशेने गाडी चालवल्याने या गाडीने एका रिक्षाला धडक दिल्याने, या विद्यार्थी वाहतूक व्हॅनला अपघात घडला. या अपघातात काही विद्यार्थी किरकोळ जखमी देखील झाले.
मागील दोन दिवसांपासून कल्याण आरटीओने अवैध विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनावर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. मागील दोन दिवसात अंबरनाथ मध्ये ५० पेक्षा जास्त अवैध विद्यार्थी वाहतूक वाहनांवर कारवाई करून तब्बल पाच लाखांपेक्षा जास्त दंड देखील वसूल केला आहे. मात्र याच कारवाईदरम्यान एका वाहन चालकाने शहराच्या पश्चिम भागात कारवाई पासून बचाव करण्यासाठी विरुद्ध दिशेने गाडी चालवली. त्याच वेळी या गाडीने एका रिक्षाला धडक दिल्याने, या विद्यार्थी वाहतूक वाहनाला अपघात घडला. त्यामुळे या अपघातात काही विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. या घटनेने पालक वर्गात एकच भीतीचे सावट पसरले आहे. त्यामुळे अशा वाहन चालकावर दंडात्मक कारवाई न करता त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला कठोर शिक्षा करावी. अशी मागणी पालक वर्ग करीत आहे. दरम्यान कारवाई करताना अशाप्रकारे अपघात घडून नये. याबाबतची काळजी देखील आरटीओने घ्यावी अशी मागणी देखील पुढे येत आहे.