

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या अगामी निवडणुकीसाठी भाजपपाठोपाठ शिवसेना शिंदे गटाकडेही इच्छुकांची झुंबड उडाली आहे. शुक्रवारी (दि. १२) निराला बाजार येथील शिवसेना शिंदे गटाच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयात ही प्रक्रिया राबविण्यात आली. त्यात दिवसभरात तब्बल ५३६ इच्छुकांनी नोंदणी करीत अर्ज नेले. आजही अर्ज वितरणाची प्रक्रिया सुरू राहणार असून रविवारी अर्ज दाखल केले जाणार आहे. तर सोमवारी मुलाखती होणार आहेत.
यावेळी समन्वय समितीचे आमदार संदीपान भुमरे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ यांच्या उपस्थितीत निराला बाजार येथील शिवसेना शिंदे गटाच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयात सकाळी इच्छुकांना अर्जाच्या वितरणाला सुरुवात झाली. प्रत्येक प्रभागातील वॉडाँसाठी इच्छुक असलेल्यांना अर्ज विरतण करण्यात आले. यात दिवसभरात पक्षाकडून तब्बल ५३६ इच्छुकांनी नोंदणी करून अर्ज नेले.
दरम्यान आज शनिवारीदेखील अर्ज विरतण केले जाणार आहे. त्यानंतर रविवारी अर्ज स्वीकृतीची प्रक्रिया होणार आहे. एकच दिवस अर्ज जमा करण्यासाठी देण्यात आला आहे. त्यामुळे रविवारी देखील मध्यवर्ती प्रचार कार्यालयात भाऊगर्दीच राहणार आहे. अर्ज स्वीकृती होताच सोमवारी समन्वय निवड समिती इच्छुकांच्या मुलाखतींना सुरुवात करणार आहे. यात सर्व इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येणार असल्याचे समन्वय समितीचे जंजाळ यांनी सांगितले.
आता लक्ष ठाकरे सेनेकडे
महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपसोबतच शिंदेसेनेकडेही इच्छुकांच्या रांगा लागल्या आहेत. दिवसभरात ५३६ इच्छुकांनी उमेदवारीसाठी अर्ज दाखल केले आहेत. दुसरीकडे काँग्रेससह दोन्ही राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे १६ दिवसांत इच्छुकांची संख्या ३०० वरही पोहचलेली नाही. आता शिवसेना ठाकरे गटाच्या अर्ज विरतणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
युतीमुळे बंडखोरी वाढणार
भाजप आणि शिवसेना शिंदे गट युतीमध्ये निवडणूक लढविणार आहे. दोन दिवसांपूर्वीच्या बैठकीत तसे ठरले आहे. त्यामुळे आता दोन्ही पक्षांकडील इच्छुकांमध्ये धाकधूक वाढली आहे. दहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर निवडणुका होत आहेत. त्यात युती होणार असल्याने अनेकांचे पत्ते कट होण्याचे संकेत मिळत असल्याने दोन्ही पक्षांत मोठ्याप्रमाणात बंडखोरी होण्याची शक्यता आहे.