

कसारा : शाम धुमाळ
केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे रद्द करा, कांद्याला भाव द्या, जुनी पेंशन लागू करा. आदिवासीच्या जमिनी नावावर करा व शेतीमालाला आधार भावाचे कायदेशीर संरक्षण द्या. या मागण्यांसाठी ऐतिहासिक शेतकरी आंदोलनाला आणखी व्यापक करण्यासाठी महाराष्ट्रात अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने भव्य राज्यव्यापी लाँग मार्च नाशिक येथून मुंबईच्या दिशेने सुरु करण्यात आला.
हा लाँग मार्च सोमवार दि 26 जानेवारी रोजी सायंकाळी सूमारे 20 हजार शेतकऱ्यांसह ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर घाट्नदेवी येथे मुक्कामी होता. मंगळवारी सकाळी 20 हजार कष्टकरी शेतकऱ्यांचा मोर्चा सकाळी 9:30 वाजता घाटनदेवी ते कसारा घाट मार्गे लतीफवाडी हे 12 किलोमीटरचे अंतर पायी येत मुंबईच्या प्रवेशद्वारा वर शहापूर तालुक्या तील कसारा येथे दाखल झाला.
या मोर्चामध्ये अखिल भारतीय किसान सभा, सीटू कामगार संघटना, अखिल भारतीय शेतमजूर युनियन, अखिल भारतीय जनवादी महिला संघटना, डीवायएफआय ही युवक संघटना व एसएफआय ही विद्यार्थी संघटना राज्यभरातील हजारो शेतकरी, कामगार, शेतमजूर, महिला, युवक व विद्यार्थ्यां सहभागी झालें आहेत. हा मार्च मुंबईकडे निघाला आहे. संयुक्त किसान मोर्चाने मुंबई येथील आझाद मैदान येथे या आवाहनानुसार सुरू करण्यात येत असलेल्या महामुक्काम सत्याग्रहात सामील होण्यासाठी किसान सभेचा हा लाँग मार्च पुढील चार दिवसात मुंबईला दाखल होणार आहे.
आझाद मैदान येथे जाहीर सभा घेण्यात येणार असून त्या सभेत महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतील सर्व पक्ष, डावे व लोकशाही पक्ष यांचे प्रमुख नेते सहभागी होणार आहेत. शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा, शेतीमालाला आधार भावाचे संरक्षण देणारा कायदा करा, वीज विधेयक मागे घ्या, कामगार संहितेमधील कामगार विरोधी बदल रद्द करा, वनजमीन तथा देवस्थान, गायरान, आकारी पडीक, बेनामी व वरकस जमीन कसणारांच्या नावे करा आणि महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी पुन्हा सुरू करून सर्व शेतकऱ्यांना योजनेचा लाभ द्या, यासह अन्य अनेक मागण्या आंदोलनातून करण्यात आल्या आहेत. अशी माहिती डॉ. अशोक ढवळे, जे.पी. गावीत, डॉ.अजित नवले डी. डी. कराड यांनी दिली असून सकाळी नऊ ते दुपारी 12 या तीन तासाच्या घटमार्गांवरील पायी प्रवासात मोर्चे करांनी केंद्र व राज्य सरकार विरोधात विविध घोषणा बाजी करीत नाशिक मुंबई राष्ट्रीय महामार्ग दुमदुमून सोडला होता.
फसवणूक करणाऱ्या दालनात चर्चेला जाणार नाही
गेली दोन दिवसापासून राज्याचे सरकार आम्हाला चर्चा करण्यासाठी आमंत्रित करते व पुन्हा बैठक रद्द करते. कष्टकरी, शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आमचा लढा सुरु असताना राज्य सरकार आमची थट्टा उडवीत असल्याने आम्ही बैठकीला जाणार नाही. जर खरेच जनतेचे सरकार असेल तर त्यांनी शेतकरी, मोर्चेकऱ्यांना समोरे जाऊन चर्चा करावी. अशी मागणी मोर्चात सहभागी लोकांनी केली आहे.
मोर्चात महिलांसह लहान मुले, वयोवृद्धांचा समावेश
या मोर्चात शेकडो माता भगिनी, लहान मुले, वयोवृद्ध सहभागी झाल्याचे चित्र पाहवयास मिळाले. केंद्र व राज्य सरकारला लाखोली वाहत मोर्चाचे नेतृत्व हीं मंडळी करीत होती. सहभागी झालेल्या सर्व कष्टकरी वर्गाने गट तयार केले होते. सकाळी पायी प्रवास करण्याअगोदर प्रत्येक गट प्रमुख आपआपल्या टीमला सोबत घेत सोबत आणलेल्या जेवणाचे साहित्य घेत नाश्ता बनवण्या साठी लगबग करीत होते. तर काही जण थाळ्या वाजवत केंद्र व राज्य सरकार विरोधात शिमगा करीत होते.
पोलीस प्रशासनाचे कौतुकास्पद काम
राजभवनावर मोर्चा घेऊन जाणाऱ्या कष्टकरी, शेतकरी बांधवाना मुंबई-नाशिक महामार्गा वर पायी चालताना व वाहणातून जात असताना अडथळे अथवा काही अडचणी उदभवू नये यासाठी ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. डि. एस. स्वामी, अप्पर पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल, उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे याच्या मार्गदर्शनाखाली कसारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सुरेश गावित यांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता. संपूर्ण कोकण परीक्षेत्राचे अधिकारी, कर्मचारी या वेळी कसारा घाटात बंदोबस्त कामी दाखल होते. महामार्ग घोटी टॅपचे प्रभारी अधिकारी होंडे, शहापूर महामार्गचे छाया कांबळे यांनी वाहतूकीला व मोर्चाला अडथळे येऊ नये म्हणून वाहतूक शाखेचे कर्मचारी तैनात केले होते. भिवडी प्रांताधिकारी अमित सानप, तहसीलदार परमेश्वर कासुळे ह्यांनी मोर्चेकरांची भेट घेतली.