

मुंबई : बेकायदेशीरपणे भारतात राहत असलेल्या बांगलादेशी महिलेच्या विरोधात कारवाई करताना रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने चोरल्याच्या आरोपावरून आरसीएफ पोलीस ठाण्याच्या एका सहाय्यक पोलीस निरीक्षकासह तीन हवालदारांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षकासह चौघांना निलंबित करण्यात आले आहे.
सुमारे महिनाभरापूर्वी आरसीएफ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका बांगलादेशी महिलेच्या घरावर पोलिस पथकाने छापा टाकला होता. या छाप्यादरम्यान घरातील रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केले होते. मात्र त्यांची कोठेही नोंद नव्हती. संबंधित महिलेने सामाजिक कार्यकर्त्याला घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर त्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने परिमंडळ 6 चे पोलीस उपायुक्त समीर शेख यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार देण्यात आली.
पोलीस उपायुक्त समीर शेख यांनी प्राथमिक चौकशीचे आदेश दिले. चौकशीत घटनास्थळावरील हालचाली, पोलीस पथकाची उपस्थिती, तसेच कारवाईदरम्यान वापरण्यात आलेल्या नोंदी तपासण्यात आल्या. उपलब्ध माहिती आणि पुराव्यांच्या आधारे चौकशीत तक्रारीत तथ्य आढळून आल्याने शनिवारी रात्री उशिरा संबंधित चारही पोलिस कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. गुन्हा दाखल होताच सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय सुतार यांच्यासह पोलीस शिपाई खांडगे, नेमाने, पेटकर या तीन हवालदारांना अटक करण्यात आली. हे चौघेही आरसीएफ पोलीस ठाण्याच्या दहशतवादविरोधी पथकात आहेत.