

ठाणे : लटकून प्रवास करणार्या प्रवासातून सुटका होण्यासाठी मेट्रोप्रमाणेच उपनगरीय वाहतूक सेवेला (लोकलला) यापुढे बंद दरवाजे असतील, सर्व लोकल वातानुकुलित असतील, या वातानुकुलित लोकल सेवेतून सेकंड क्लासच्या दरात प्रवाशांना प्रवास करता येईल,
तसेच ठाणे आणि मुंबई महानगर प्रदेशाची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी 2028 -29 पर्यंत मेट्रोचे सुमारे 400 किलोमीटरचे काम पूर्ण होणार असून 2030 पर्यंत सर्व मेट्रोचे जाळे मुंबई महानगर प्रदेशात आपआपसात जोडले जातील, असा मुंबई महानगर प्रदेशाचा वाहतूकीचा आराखडा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाणेकरांच्या समोर मांडला.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने ठाणे महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवरठाण्याच्या सर्वांगीण प्रगतीचा वेध घेण्यासाठी आपलं ठाणे आपला देवाभाऊ या संकल्पनेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत बुधवारी घेण्यात आली. गडकरी रंगायतन येथे ज्येष्ठ पत्रकार मिलिंद बल्लाळ आणि अभिनेत्री तेजश्री प्रधान यांनी ही मुलाखत घेतली. प्रारंभी आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्राच्या उपाध्यक्षा माधवी नाईक. ठाणे शहर जिल्हाध्यक्ष अृॅड. संदीप लेले आदिंनी छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्यास अभिवादन केले.
ठाणे शहरातील सततच्या वाहतूक कोंडीच्या संदर्भात प्रधान यांनी प्रश्न उपस्थितीत केला असता, देवेंद्र फडणवीस यांनी , त्यांच्याकडे सत्ता असतांना त्यांनी 11 वर्षात मेट्रोचे 11 किलोमीटर काम केले 2014 मध्ये आमची सत्ता आल्यानंतर आम्ही मेट्रोच्या कामातील अनेक अडचणी,स्थगिती यांचा सामना करून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतांना वेगाने मेट्रोचे काम हाती घेतले. सुमारे 475 किलोमीटर पैकी मेट्रोचे 200 किलोमीटरचे काम पूर्ण झाले असून येत्या 2 - 3 वर्षात मेट्रोचे काम पूर्ण होईल. तसेच मुंबई महानगर प्रदेशातील ठाण्यासह, कल्याण, भिवंडी येथेही मेट्रो धावेल, मुंबई मेट्रो 3,4, आणि 5 ही मेट्रो ठाणे शहरातील रिंग मेट्रोशी जोडण्यात येणार आहे.