

वाडा : वाडा तालुक्यातील गारगाव गावात एका कातकरी मुलीचे नाशिक (वडगाव) येथे अन्य जातीतील तरुणाशी जबरदस्तीने लग्न लावून दिल्याची घटना उघड झाली आहे. लग्नानंतर सतत होणारी शिवीगाळ, मानसिक व शारीरिक छळ याला कंटाळून अखेर मुलीने वाडा पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.
वाडा तालुक्यात लग्नासाठी तरुणींची होणारी विक्री, बालविवाह व त्यानंतर छळाच्या घटना काहीकेल्या थांबायला तयार नसून सरकारने याविरोधात आता कठोर भूमिका घेण्याची मागणी केली जात आहे.
पोलिसांनी गुन्हा नोंद केल्यानुसार तालुक्यातील गारगाव गावातील एका कातकरी समाजातील तरुणीचा 2024 साली नाशिक जिल्ह्यातील वडगाव येथील या अन्य जातीतील तरुणाशी आर्थिक व्यवहार करून लग्न लावून देण्यात आले. नाशिक हे दूरचे स्थळ असल्याने मुलीची आई लग्नास तयार नव्हती मात्र गावातील एका महिलेने आधी फूस लावली व नंतर दम भरल्याने मुलीची आई नाईलाजाने लग्नास तयार झाली. खोडाळा येथील रघुनाथ दुधवडे या एका मध्यस्थाच्या वतीने हा विवाह संपन्न झाला.
काही दिवसांनी मात्र काम येत नाही, जेवण बनवता येत नाही अशा तक्रारी करून छळ वाढू लागला. मध्यस्थी असणाऱ्या रघुनाथ दुधवडे याला आम्ही m3 लाख दिले, ते परत दे आणि खुशाल घरी जा असे धमकावण्यात आले. घाबरलेल्या अवस्थेत या मुलीने अखेर वाडा पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार सांगून गुन्हा नोंदविला आहे.
वाडा पोलिसांनी 4 आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून यात पतीसह मध्यस्थी व्यक्तीचा समावेश आहे. वाडा तालुक्यासह परिसरात मुलींची लग्नासाठी विक्रीच्या घटना उजेडात येत असून ही गंभीर बाब आहे.