

बदलापूर : बदलापूर पूर्वेकडील खरवई एमआयडीसीत केमिकल कंपनीत झालेल्या स्फोटांमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.
बुधवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास बदलापूर एमआयडीसीतील महावितरणच्या पॉवर हाऊस मागे असलेल्या कंपनीत भीषण स्फोट झाले. घटनेची माहिती मिळताच बदलापूर एमआयडीसीतील कुळगांव बदलापूर नगर परिषदेच्या अग्निशामन दलाने घटनास्थळी धाव घेऊन ही आग विझवण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र एकामागे एक होत असलेल्या स्फोटामुळे ही आग आजूबाजूच्या कंपन्यांमध्ये देखील पसरली.
आग मोठी असल्यामुळे अंबरनाथ आणि उल्हासनगर येथूनही अग्निशामन दलाच्या अधिक कुमक मागवण्यात आली. रात्री उशिरापर्यंत या कंपन्यांमध्ये आग विझवण्याचं काम अग्निशमन दलाकडून सुरू होतं. घटनास्थळी बघ्यांनी गर्दी केली होती. पोलिसांनी गर्दी पांगवून अग्निशामन दलाच्या वाहनांना व पाण्याच्या टँकरला जागा मोकळी करून दिली.
प्रथमदर्शनी या स्फोटांमध्ये कोणीही जखमी झाल्याची माहिती नाही. मात्र रात्री उशिरापर्यंत या ठिकाणी कुलिंग ऑपरेशन सुरू होते. बदलापूर एमआयडीसीत वारंवार आगीच्या घटना घडत असून याच कंपन्यांच्या शेजारी गेल्यावर्षीही अशाच प्रकारचा भीषण स्फोट झाला होता. त्यामुळे एमआयडीसीशी निगडित यंत्रणा करतात काय ? असा सवाल बदलापूरकर विचारत आहेत.