

ठाणे : महानगरपालिका मतदान भयमुक्त वातावरणात पार पडावे यासाठी पोलिसांनी जय्यत तयारी केली आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार असून पोलिंग बूथ व परिसरावर ड्रोन कॅमेऱ्याची नजर राहणार आहे. मतदानासाठी अतिरिक्त पोलीस बल ठाणे जिल्ह्यात तैनात राहणार आहेत. तर गुंड प्रवृत्तीच्या सुमारे दीड हजार व्यक्तींवर पोलिसांनी विविध कलमाखाली प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. तर येत्या दोन दिवसात आणखी उपद्रवी गुंडांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली.
ठाणे महानगरपालिका निवडणुकीत 15 जानेवारी रोजी मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यासाठी पोलीस आणि निवडणूक प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीत व पारदर्शक संपन्न व्हावी यासाठी पुरेपूर दक्षता घेण्यात आली आहे. पोलीस प्रशासनाकडून निवडणूक क्षेत्रात कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी तीन अप्पर पोलीस आयुक्त,9 पोलीस उपायुक्त, 18 सहाय्यक पोलीस आयुक्त आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सुमारे 9 हजार पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहेत.
त्याचप्रमाणे भरारी पथके, उत्पादन शुल्क भरारी पथक, सायबर सर्व्हेलियन्स, व्हीडिओ सर्व्हेलियन्स असे विविध पथके देखील या मतदान प्रक्रियेवर आपली करडी नजर ठेवून राहणार आहेत. भरारी पथक व मतदान प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या इतर सर्व प्रशासकीय पथकांसाठी एक हजाराहून अधिक वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे.
काही ठिकाणी मतदान केंद्रे संवेदनशील घोषित करण्यात आली असून या मतदान केंद्रावर सीसीटीव्हीची नजर राहणार आहे. तसेच प्रत्येक मतदान केंद्र व परिसरात ड्रोन कॅमेऱ्याने गस्त घातली जाणार असून त्याद्वारे पोलीस संपूर्ण परिस्थितीवर करडी नजर ठेवून राहणार आहेत.
पोलीस यंत्रणेप्रमाणेच निवडणूक प्रशासनाने देखील या मतदान प्रक्रियेसाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची नेमणूक केली आहे. तसेच मतदानावेळी कोणत्याही राजकीय पक्षाला मतदाराला आपल्या वाहनातून घेऊन जाता येणार नाही, तेच वाहन पुन्हा त्याच मतदान केंद्रावर दिल्यावर ते जप्त करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे. प्रत्येक मतदान केंद्राबाहेर पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र थांबता येणार नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. निवडणूक काळात कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केली आहे.
तीन हजार शस्त्रे जमा
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परवानाधारक शस्त्रे जमा करण्याची कारवाई पोलिसांनी सुरू केली आहे. 3 हजार 760 मंजूर परवाना शस्त्रांपैकी आतापर्यंत 3 हजार 69 परवानाधारक शस्त्रे जमा केली आहेत. तर निवडणूक काळात अनुचित घटना घडू नये आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून अवैध शस्त्र तस्करी विरोधात पोलिसांनी कारवाई मोहीम राबवून 27 पिस्तुल, 37 जिवंत काडतुसे, 142 चाकू-सुरे जप्त केले आहेत.
दारूचा महापूर
परप्रांतातून येणाऱ्या या दारूसाठ्याविरोधात पोलिसांनी व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने कारवाई मोहीम राबवली आहे. या कारवाई अंतर्गत ठाणे पोलीस आयुक्तालय हद्दीतून 13 हजार 215 लिटर देशी आणि विविध ब्रांडची अवैद्य विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे.
ड्रग्जचा विळखा
पोलिसांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ड्रग्ज तस्करीवर देखील करडी नजर रोवली आहे. ठाणे पोलिसांनी आतापर्यंत ड्रग्ज तस्करी व विक्रीचे 2 हजार 919 गुन्हे दाखल केले असून तब्बल 78 कोटी 35 लाख 60 हजार रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आहे. तर एनडीपीएस ॲक्टनुसार 3 हजार 144 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
दोन कोटी सोळा लाखांची रोकड जप्त
निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार निवडणूक खर्चाचा व्यवहार करण्यासाठी उमेदवाराला बँकेमध्ये स्वतंत्र खाते उघडणे बंधनकारक केले आहे. या बँक खात्यामार्फत करण्यात आलेल्या व्यवहाराचा तपशील खर्च सनियंत्रण कक्षाकडे सादर करणे बंधनकारक आहे.आचार संहिता काळात मोठी आर्थिक उलाढाल करणाऱ्या व संशयास्पद बँक खात्यावर पोलिसांनी आपले विशेष लक्ष केंद्रित केले आहे. ऑनलाईन बँकिंगच्या माद्यमातून होणाऱ्या आर्थिक हेराफेरीवर देखील पोलिसांच्या सायबर सेल विभागाची करडी नजर असून ऑनलाईन बँकिंगच्या माध्यमातून होणाऱ्या आर्थिक व्यवहारावर पोलिसांचे लक्ष राहणार आहे. दरम्यान, आचार संहिता काळात आतापर्यंत 2 कोटी 16 लाख 89 हजार रुपयांची बेहिशोबी रक्कम जप्त करण्यात आली आहे.