गर्भपात करण्यासाठी चक्क ओटी-पोटावर हाणल्या लाथा; सासू-जावेसह सात जणांवर गुन्हा दाखल | पुढारी

गर्भपात करण्यासाठी चक्क ओटी-पोटावर हाणल्या लाथा; सासू-जावेसह सात जणांवर गुन्हा दाखल

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा : तळपायाची आग मस्तकात जाणारा धक्कादायक प्रकार कल्याणच्या कोळसेवाडी पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या एका प्रकरणातून उघडकीस आला आहे. वारंवार सांगूनही गर्भपात करून घेत नाही म्हणून संतापलेल्या सासू आणि जावेने मिळून भर रस्त्यात अडवून आपल्या ओटी-पोटावर लाथा हाणल्याची गंभीर तक्रार कल्याण पूर्वेत सद्या माहेरी राहणार्‍या गर्भवतीने पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. तिसगाव परिसरात असलेल्या साई दर्शन सोसायटीतील एका कुटुंबाच्या बाबतीत हा धक्कादायक प्रकार सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडला आहे. पोलिसांनी सासू आणि जावई वगळता आतापर्यंत तिघांना ताब्यात घेतले आहे.

संबंधित बातम्या 

या संदर्भात पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रेखा भगवान लोकरे (33) असे तक्रारदार गर्भवतीचे नाव आहे. ही महिला सद्या आपल्या माहेरी आईकडे कल्याणात राहते. तर नवी मुंबईच्या कामोठ्यातील सेक्टर 11 येथील येथे कृष्णकुंज अपार्टमेंटमध्ये रेखाचे सासर आहे.

रेखाने गर्भपात करावा म्हणून नवी मुंबईतील सासरची सासू, दीर, जाव ही मंडळी तिला सातत्याने जाच करत असतात. मात्र रेखा काहीकेल्या त्यांचे म्हणणे ऐकत नाही. सोमवारी रात्री पावणेनाऊच्या सुमारास सासरची मंडळी नवी मुंबईतून कल्याणमध्ये रेखाला जाब विचारण्यासाठी आले होते. रेखा दुचाकीवरून जात असताना भर रस्त्यात दीर रोहित याने तिला खेचून पकडून ठेवले.

जाव दीपाली, सासू सविता यांनी रेखाचे केस पकडून सतत सांगुनही तू गर्भपात का करून घेत नाहीस ? असा जाब विचारत तिच्या ओटी-पोटावर लाथा मारल्या. शिवाय दोघींनी नखांनी बोचकारून तिला जखमी केले. हल्लेखोरांच्या तावडीतून सुटका करवून घेऊन रेखाने स्वतःच्या घराकडे पळ काढला.

आतापर्यंत तिघांना अटक

सासरच्या मंडळींनी दिलेल्या क्रूर वागणुकीमुळे हैराण झालेल्या जखमी रेखाने कोळसेवाडी पोलिस ठाण्यात जाऊन तिच्यावर बेतलेल्या प्रसंगाची पोलिसांजवळ कहाणी कथन केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून सासू सविता रघुनाथ जावीर (47) आणि जाव दिपाली सुरज जावीर (24) या दोघींना वगळता मोठा दिर सुरज जावीर (28), छोटा दिर रोहित (27) आणि प्रकाश काशिनाथ गोरवे (43, रा. एलआयजी फर्स्ट सेक्टर नं. 3, रूम नं. बी/79, कळंबोली, नवी मुंबई) अशा तिघांना ताब्यात घेतले आहे. या सात जणांपैकी दिर रोहित याचा मित्र व त्याच्या सोबत असलेल्या एका अनोळखी महिलेचा पोलिस उपनिरीक्षक यु. व्ही. जाधव आणि त्यांचे सहकारी शोध घेत आहेत.

Back to top button