Lok Sabha Election 2024 | दिंडोरीत पवार गटाचे तूर्तास एकला चलो रे! | पुढारी

Lok Sabha Election 2024 | दिंडोरीत पवार गटाचे तूर्तास एकला चलो रे!

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- महाविकास आघाडीच्या जागा वाटपात दिंडोरी मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वाट्याला आला आहे. त्यामुळे पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असताना, आघाडीत घटक पक्ष असलेल्या काँग्रेस व शिवसेना ठाकरे गटात शांतता पाहायला मिळत आहे, तर मित्रपक्ष माकपानेही जागेवर दावा केला आहे. त्यामुळे आघाडीतच सध्या ताळमेळाचा अभाव असल्याचे पाहायला मिळत आहे.

लोकसभेचा रणसंग्राम सुरू झाला आहे. निवडणुकांच्या या आखाड्यात उत्तर महाराष्ट्रातील नाशिक व दिंडोरी हे मतदारसंघ सध्या चर्चेत आहेत. नाशिकमध्ये महायुती व महाआघाडीचा उमेदवार निश्चित झालेला नाही, तर शेजारच्या दिंडाेरीत भाजपने डॉ. भारती पवार यांनाच पुन्हा संधी दिली आहे. त्यांच्यासमोर पवार गटातून भास्कर भगरे यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. केवळ त्यांच्या नावाच्या घोषणेची औपचारिकता बाकी आहे. त्यामुळे पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी लढतीसाठी तयारी सुरू केली आहे. परंतु, आघाडीतील मित्रपक्ष काँग्रेस व ठाकरे गटाचा अद्यापही म्हणावा तसा प्रतिसाद पवार गटाला मिळत नसल्याचे चित्र आहे.

राज्यात लोकसभा निवडणुकीला महाविकास आघाडी म्हणून सामाेरे जात असताना दिंडोरीत मात्र वेगळे चित्र आहे. पवार गटाकडून मतदारांच्या भेटी, चौकसभा व पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचे सत्र अवलंबले आहे. मित्रपक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी या सभांना उपस्थित राहणे अपेक्षित आहे. परंतु, दोन्ही पक्षांचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते जाणूनबुजून अशा बैठकांपासून स्वत:ला दूर ठेवत आहेत. त्यातच आघाडीमधील घटक पक्ष असलेल्या माकपने दिंडोरीवर हक्क सांगितला आहे. माकपने जागेसाठी आग्रही भूमिका घेताना सव्वा लाखाच्या आसपास मतदार पाठीशी असल्याचा दावा केला आहे. विशेष म्हणजे माकपच्या या भूमिकेनंतरही काँग्रेस व ठाकरे गटाने चुप्पी साधली आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर पवार गटाला ‘एकला चलो रे’ची भूमिका पार पाडावी लागत आहे.

भाजप-माकप छुपी युती?

लोकसभा निवडणुकीमध्ये दिंडाेरी मतदारसंघात भाजप विरुद्ध पवार गट असा सरळ सामना रंगणार आहे. जशी-जशी वेळ पुढे सरकेल, तसे लढतीत रंग भरले जातील. पण तत्पूर्वीच माकपने जागेसाठी आग्रही भूमिका घेत मविआवर दबावतंत्र वापरण्याचा प्रयत्न केला आहे. माकपच्या या भूमिकेमागे भाजपची खेळी असून, निवडणुकीत या दोन्ही पक्षांची छुपी युती असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

हेही वाचा –

Back to top button