Mahesh Gaikwad: शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल  | पुढारी

Mahesh Gaikwad: शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल 

नेवाळी (ठाणे) : पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यास काही कालावधी असताना कल्याण डोंबिवलीत गुन्हेगारी कमी होण्याचे नाव घेत नाही. नुकताच शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर जमिनीच्या वादातून हिललाईन पोलीस ठाण्यात गोळीबार झाल्याची घटना ताजी असताना अन्य एका जमिनीच्या प्रकरणात महेश गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जमिनीचे वाद निवडणूक कालखंडात पोलीस यंत्रणांना त्रासदायक ठरण्याची चिन्ह दिसून येत आहेत. Mahesh Gaikwad
कल्याण डोंबिवली मनपाचे माजी नगरसेवक, शिवसेनेचे शहरप्रमुख महेश दशरथ गायकवाड यांच्यावर शुक्रवारी एका बांधकाम व्यावसायिकाने पाच कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप करत हिललाईन पोलीस ठाण्यात शुक्रवारी तक्रार केली आहे. पोलिसांनी महेश गायकवाड यांच्यासह मलंगवाडी येथील चार ग्रामस्थांवर खंडणी, दमदाटीचे गुन्हे दाखल केले आहेत. जमीन विषयीच्या प्रकरणात महेश गायकवाड यांच्यावर हिललाईन पोलीस ठाण्यात दाखल झालेला हा गेल्या दोन महिन्यातील दुसरा गुन्हा आहे. Mahesh Gaikwad
या गुन्ह्यांमुळे महेश यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. आरोपींमध्ये महेश गायकवाड, यशवंत फुलोरे, रोहिदास फुलोरे, गणेश यशवंत फुलोरे, शेवंतीबाई मुका फुलोरे यांचा समावेश आहे. नुकताच भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केल्यानंतर महेश  २५ दिवस ठाण्यातील  रुग्णालयात उपचार घेत होते. आताच ते सुस्थितीत होऊन विकास कामे मार्गी लावण्यासाठी सक्रिय झाले आहेत. नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर येथील बांधकाम व्यावसायिक सदृध्दीन बशर खान यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. त्यांची एफएस ग्रुप ऑफ कंपनीज ही बांधकाम कंपनी आहे. ऑगस्ट २०२३ ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत हा खंडणी मागण्याचा प्रकार घडला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार न्यायालयाच्या आदेशाने हा गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, हा गुन्हा दाखल झाल्यानंतर शिवसेनेकडून कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. त्यामुळे आचारसंहिता कालखंडात कल्याण डोंबिवली पुन्हा जमिनीचे वाद चव्हाट्यावर येण्यास सुरुवात झाली आहे.

Mahesh Gaikwad मलंगगडाच्या पायथ्याशी असलेल्या कुशीवली येथील प्रकार

तक्रारदार सदृध्दीन खान यांनी २००९ मध्ये इक्बाल खान यांच्या ओळखीने मलंगगडाच्या पायथ्याशी असलेल्या कुशीवली गावातील श्यामसुंदर लक्ष्मण पाटील यांची २७ एकर जमीन महसूल विभागाच्या सर्व प्रक्रिया पूर्ण करून, खरेदी विक्रीची दस्त नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून जमीन खरेदी केली. सात बारा उतारा खान यांच्या नावे देखील झाला आहे. तक्रारदार खान यांनी २०१९ मध्ये अंबरनाथ भूमी अभिलेख विभागाच्या माध्यमातून जमीन मोजणी करून घेतली होती. त्यावेळी शेवंताबाई मुका फुलोरे आणि इतरांनी त्यास विरोध केला होता. शिवीगाळ करत मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर पोलिस बंदोबस्त असताना मोजणी अधिकाऱ्यांनी मोजणी पूर्ण केली होती.
ऑगस्ट २०२३ मध्ये जमीन मालक खान यांच्या जमिनीवर ‘ही जमीन महेश गायकवाड आणि इतर आरोपींच्या कब्जे वहिवाटीची आहे. या जमिनीत कोणी अतिक्रमण केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल’ असा फलक लावला होता. मालकीच्या जमिनीवरील बेकायदा फलक खान यांनी काढण्याचा प्रयत्न केला त्याला आरोपींनी विरोध केला. आम्हाला तुमच्या जमिनीतील अर्धी जमीन द्या, अन्यथा आम्हाला पाच कोटी द्या, अशी मागणी आरोपींनी खान यांच्याकडे केली.
सप्टेंबर २०२३ मध्ये खान यांनी हिललाईन पोलिसांच्या सहकार्याने कुशीवली येथील जागेत आरोपींनी लावलेला कब्जे वहिवाटीचा फलक काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पाचही आरोपींनी त्यास विरोध केला. यावेळी महेश गायकवाड आणि त्यांचे साथीदार घटनास्थळी वाहनांमधून आले. त्यांनी खान यांच्या जमिनीवर लावलेला कब्जे हक्काचा फलक काढण्यास विरोध केला. आम्ही जी पाच कोटीची मागणी केली आहे, ती पूर्ण करा, अशी मागणी खान यांच्याकडे केली. पोलिसांनी मध्यस्थी केल्याने महेश गायकवाड साथीदारांसह तेथून निघून गेले होते.

जमीन मालक यांची हिललाईन पोलीस ठाण्यात तक्रार

मालकी हक्काची जमीन असुनही त्यावर महेश गायकवाड यांच्यासह इतर आरोपी कब्जे हक्क सांगत होते. त्यामुळे खान त्रस्त होते. नोव्हेंबर २०२३ मध्ये खान कुशीवली येथील जमीन पाहणीसाठी आले त्यावेळी तेथील त्यांच्या मालकी हक्काच्या सर्वे क्रमांक ८२-ब या २७ एकर जमिनीवर ‘सदर जमीन नगरसेवक महेशशेठ गायकवाड, फुलोरे यांच्या कब्जे वहिवाटीची आहे. सदर जागेत कोणीही अतिक्रमण केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल,’ असा ठळक अक्षरातील फलक लावला होता. महेश गायकवाड, फुलोरे कुटुंबीय आपल्या मालकीच्या जागेत हक्क दाखवून बेकायदा आपल्या जमिनीचा ताबा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच जमिनीवरील हक्क सोडण्यासाठी पाच कोटी खंडणीची मागणी करत असल्याने जमीन मालक सदृध्दीन खान यांनी हिललाईन पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
हेही वाचा 

Back to top button