ठाणे; पुढारी वृत्तसेवा : बैलगाडा शर्यतीदरम्यान (bullock cart race) पनवेलमध्ये डोंबिवलीचे राहुल पाटील आणि संदीप माळी यांच्यात वाद झाल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. दोन्ही गटांकडून एकमेकांवर तुफान दगडफेक करण्यात आली होती. हे वाद विकोपाला जाऊ नयेत यासाठी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी मध्यस्थी करत वाद मिटवला आहे. दोघांमध्ये निर्माण झालेले गैरसमज दूर करण्यात आले असल्याचे दोघांकडून सांगण्यात आले आहे.
डोंबिवलीचे राहुल पाटील आणि संदीप माळी यांच्यात पनवेल येथील ओवळे येथे वाद निर्माण झाला होता. वादाला कारण ठरला होता तो सोन्या बैलाचा मालक जयेश पाटील. आपली बैलजोडी स्पर्धेत नसताना देखील पाटील यांचा पराभव झाला म्हणून जयेश पाटील हे माळी यांच्या छकड्यावर बसून जल्लोष करत होते. त्यामुळे संतापलेल्या मथुर बैलाच्या समर्थकांनी थेट दगड फेक केल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र या प्रकरणात जयेश पाटील हे निसटले आणि वाद झाला संदीप माळी आणि राहुल पाटील यांचा. या वादाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने या वादावर पडदा टाकणे आवश्यक होते. यासाठी ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विनोद शेठ पाटील यांनी पुढारा घेतला होता. बुधवारी या संदर्भात दोघांची बैठक देखील घेण्यात आली होती. तब्बल दोन तास एकमेकांचे चर्चासत्र विनोद शेठ यांच्यासोबत सुरु होते. या संदर्भात बैलगाडा संघटनेकडून अधिकृत संदेश जाहीर करण्यात आला आहे. त्यात म्हट्ले आहे की, झालेल्या प्रकाराबाबत दोघांमध्ये जो गैरसमज होता तो दूर करण्यात आला आहे. हा वाद दोघांच्या काही समर्थकांमध्ये झाला होता. या शर्यतीपूर्वी दोघे एकमेकांच्या भावासारखे राहत होते. आता पण दोघांचे संबंध भावा सारखेच आहेत. यापुढे असा प्रकार पुन्हा होणार नाही असे शब्द देण्यात आले असून दोघांनी आपआपल्या समर्थकांना शांत राहण्याचे आदेश दिले आहेत. असं या संदेशात म्हटले आहे.
ठाणे, रायगड जिल्ह्यात सुरु असलेल्या बैलगाडा शर्यतींमधील (bullock cart race) वाद विकोपाला जात असल्याने पोलीस यंत्रणांची डोकेदुखी वाढू लागली आहे. पनवेल मधील या उफाळून आणलेल्या वादाला वेळीच शांत करण्यात दिवंगत कामगार नेते रतनबुवा पाटील यांचे सुपुत्र विनोद पाटील यांना यश आले आहे. त्यामुळे यापुढे सर्वांनी शांततेत बैलगाडा शर्यत खेळण्याचे आवाहन विनोद पाटील यांनी केले आहे.
हेही वाचा :