त्र्यंबकेश्वर: पुढारी वृत्तसेवा– आद्य ज्योर्तिलिंग त्र्यंबकेश्वर मंदिर देवस्थान संस्थान महाशिवरात्रीसाठी सज्ज झाले आहे. भक्तांची वाढती संख्या लक्षात घेत खबरदारीचा उपाय म्हणून भाविकांकरिता गर्भगृह दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय ट्रस्टने घेतला आहे.
त्र्यंबकेश्वर मंदिराचे दरवाजे वर्षभर पहाटे पाचला उघडतात आणि रात्री ९ वाजेला बंद होतात. मात्र वर्षभरात केवळ महाशिवरात्रीस अहोरात्र मंदिर भक्तांना दर्शनासाठी खुले असते. महाशिवरात्रीनिमित्त फक्त ज्योर्तिलिंगाचे मंदिर शुक्रवारी पहाटे चारपासून शनिवारी (दि. ९) रात्री नऊपर्यंत भाविकांना दर्शनार्थ खुले राहील. देवस्थान ट्रस्टतर्फे मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाईने सजविण्यात आले आहे. मंदिराचे गर्भगृह, सभामंडप, प्रवेशद्वार उत्तर आणि पूर्व महाद्वार, या ठिकाणी फूलांची सजावट करण्यात येत आहे. येणाऱ्या भाविकांची सोय ही नुकत्याच बांधण्यात आलेल्या पूर्वदरवाजा भव्य दर्शन मंडपातून व त्याच्या दोन्ही बाजूने करण्यात येणार आहे. भाविकांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा करण्यात आलेली आहे. तातडीने दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी २०० रुपये देणगी दर्शन सुरु राहणार आहे.
महाशिवरात्रीनिमित्त ट्रस्टतर्फे २ दिवस सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे. त्यामध्ये सात मार्चला संध्याकाळी प्रसिद्ध गायक प्रथमेश लघाटे व मुग्धा वैशंपायन यांचा संगीत गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. नऊ मार्चला संध्याकाळी ओम नटराज ॲकेडमीतर्फे कथ्थक नृत्याचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. यासाठी नृत्य दिग्दर्शन मयुरी बेडककर यांनी केलेले आहे. हे सर्व कार्यक्रम मंदिराच्या पटांगणात होणार आहेत.
महाशिवरात्रीस पुर्व संस्थानिक जोगळेकर यांच्या वाड्यावरून पाचआळीमार्गे पालखी काढ्यात येते. परंपरेनुसार आठ मार्चला दुपारी ३:०० वाजता त्र्यंबकराजांची पालखी मंदिरातुन निघून पारंपरिक मार्गानुसार तिर्थराज कुशावर्त येथे षोडशोपचार पुजा करुन संध्याकाळी ५ वाजेपर्यंत पालखी पारंपरिक मार्गाने पुन्हा देवस्थानमध्ये येईल. तसेच देवस्थान ट्रस्टतर्फे आठ मार्चला परंपरेप्रमाणे ज्योर्तिलिंगावर लघुरुद्र अभिषेक सायंकाळी करण्यात येणार आहे. महाशिवरात्रीनिमित्त दरवर्षीप्रमाणे भगवान त्र्यंबकराजांची विशेष महापूजा व पालखी सोहळा रात्री ११:०० ते ०२:३० या वेळेत होणार आहे.
हेही वाचा ;